इंडोनेशियाने डेन्मार्कवर ३-२ अशी मात करूनही भारताने सुदीरमन चषक आंतरराष्ट्रीय मिश्र बॅडमिंटन स्पर्धेची बाद फेरी गाठली. साखळी गटातील पहिल्या सामन्यात डेन्मार्कने  भारताला ४-१ असे हरवले होते, मात्र नंतरच्या सामन्यात भारताने इंडोनेशियावर ४-१ अशी सनसनाटी मात केली होती. साखळी गटात प्रत्येकाने एक सामना जिंकला. त्यामुळे बाद फेरीसाठी जिंकलेल्या लढतींचा विचार करण्यात आला. त्याच्या आधारे डेन्मार्क व भारताला बाद फेरीत प्रवेश मिळाला. डेन्मार्कने सहा लढती जिंकल्या तर चार लढती गमावल्या. भारताने पाच लढती जिंकल्या व पाच लढतींमध्ये पराभव स्वीकारला. इंडोनेशियाने चार लढतींमध्ये विजय मिळविला, मात्र त्यांनी सहा लढती गमावल्या.

भारताने यापूर्वी २०११ मध्ये या स्पर्धेची बाद फेरी गाठली होती. गेल्या दोन स्पर्धामध्ये त्यांना साखळी गटातच पराभव स्वीकारावा लागला होता. इंडोनेशियाच्या प्रवीण जॉर्डन व डेबी सुसांतो यांनी लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या जॉकिम फिशर व ख्रिस्तिना पेडरसन यांना २१-१२, २१-१३ असे हरवले. पाठोपाठ इंडोनेशियाच्या अँथोनी सिनिसुका गिंगतिंगने ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या व्हिक्टर अ‍ॅक्सेलसनवर १३-२१, २१-१७, २१-१४ असा आश्चर्यजनक विजय नोंदवला व संघास २-० अशी आघाडी मिळवून दिली. परंतु माजी ऑलिम्पिक रौप्यपदक विजेते मथायस बोई व कर्स्टन मोगेन्सन यांनी जागतिक अव्वल क्रमांकाची जोडी माकरेस फर्नाल्डी गिडीओन व केव्हिन संजया सुकामलिजो यांच्यावर १६-२१, २४-२२, २३-२१ असा रोमहर्षक विजय मिळविला. या विजयामुळे डेन्मार्कचे आव्हान राखले गेले. पण इंडोनेशियाच्या फित्रियानी फित्रिओनीने मिआ ब्लिटफेल्ड्टचा २२-२४, २१-१५, २१-१४ असा पराभव केला आणि संघाला ३-१ अशी आघाडी मिळवून दिली. महिलांच्या दुहेरीत ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या कॅमिला जुहेल व ख्रिस्तिना पेडरसन यांनी इंडोनेशियाच्या ग्रेसिया पोईली व अप्रियानी रहायू यांना २१-१८, १३-२१, २१-१३ असे हरविले. डेन्मार्कने या लढतीमधील विजयामुळे इंडोनेशियास एकतर्फी विजयापासून वंचित ठेवले. तसेच या विजयामुळे त्यांचा बाद फेरीतील प्रवेशही निश्चित झाला.