भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला सुरक्षेसह सर्व गोष्टींची लेखी हमी मिळाल्यास पाकिस्तानचा संघ भारतात क्रिकेट मालिका खेळू शकतो असे मत अष्टपैलू शाहिद आफ्रिदीने व्यक्त केले.

सर्व गोष्टींबाबत बीसीसीआयकडून लेखी स्वरुपात हमी मिळायला हवी अशी भूमिका पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांनी मांडली होती. आफ्रिदीने खान यांच्या भूमिकेला अनुमोदन दिले.

२०१२-१३ मध्ये आम्ही भारताचा दौरा केला होता. त्यावेळी बीसीसीआयला लक्षावधी रुपयांचे उत्पन्न मिळाले मात्र आम्हाला काहीही मिळाले नाही असा गौप्यस्फोटही आफ्रिदीने केला. यावेळी बीसीसीआयने सुरक्षा व्यवस्थेसह मानधनाची हमी द्यायला हवी. भारतात मालिका आयोजित झाल्यास असे होऊ शकते असे आफ्रिदीने सांगितले.

‘सामंजस्य कराराप्रमाणे डिसेंबर महिन्यात मालिका होणे अपेक्षित आहे. मात्र बीसीसीआयच्या चालढकल भूमिकेमुळे ठोस निर्णय होऊ शकलेला नाही’, असे आफ्रिदीने सांगितले.