पहिल्या टी-२० सामन्यात ११ धावांनी बाजी मारल्यानंतर, लागोपाठ दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय फलंदाजांनी धडाकेबाज खेळ करत ६ गडी राखून बाजी मारली आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या १९५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून शिखर धवन, विराट कोहली आणि मधल्या फळीत हार्दिक-श्रेयस अय्यरच्या जोडीने फटकेबाजी करत सामन्याचं चित्र बदलून टाकलं. या विजयासह भारताने ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-० ने बाजी मारली आहे. १९५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ मधल्या काही षटकांमध्ये अडचणीत सापडला होता. विराट कोहली माघारी परतल्यानंतरही हार्दिक पांड्या आणि श्रेयस अय्यर जोडीने फटकेबाजी करत कांगारुंच्या हातात आलेला विजयाचा घास हिसकावून घेतला. हार्दिकने २२ चेंडूत ३ चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद ४४ धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

१९५ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने आक्रमक सुरुवात केली. सलामीवीर शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत भारत सहज हार मानणार नाही हे स्पष्ट केलं. ५६ धावांची भागीदारी झाल्यानंतर अँड्रू टायने राहुलला माघारी धाडलं. यानंतर शिखर आणि विराटने पुन्हा एकदा जम बसवत भारताच्या डावाला आकार दिला. यादरम्यान शिखरने आपली फटकेबाजी सुरु ठेवत अर्धशतक झळकावलं. ही जोडी मैदानावर कमाल करणार असं वाटत असतानाच, झॅम्पाच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका खेळण्याच्या प्रयत्नात शिखर बाद झाला. त्याने ३६ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ५२ धावांची खेळी केली.

फलंदाजीत बढती मिळालेल्या संजू सॅमनने काही चांगले फटके खेळत आश्वासक सुरुवात केली. परंतू हाराकिरी करत त्याने विकेट फेकत भारताच्या अडचणींमध्ये भर घातली. स्वेप्सनने सॅमसनचा बळी घेतला. यानंतर विराट कोहलीने पांड्याच्या साथीने सुरेख फटकेबाजी करत भारताचं आव्हान कायम ठेवलं. परंतू अखेरच्या षटकांमध्ये धावांचं आव्हान लक्षात घेता फटकेबाजी करण्याच्या नादात विराट डॅनिअल सम्सच्या गोलंदाजीवर माघारी परतला. त्याने ४० धावांची खेळी केली. यानंतर मैदानावर आलेल्या हार्दिक पांड्या आणि श्रेयस अय्यरने फटकेबाजी करत सामन्यात रंगत आणली आणि भारताचं आव्हान कायम ठेवलं. अखेरच्या दोन षटकांत भारताला विजयासाठी २५ धावांची गरज होती. भारतीय फलंदाजांनी हे आव्हान सहज पूर्ण करत सामना खिशात घातला.

कर्णधार मॅथ्यू वेडचं अर्धशतक आणि त्याला स्टिव्ह स्मिथने फटकेबाजी करत दिलेल्या उत्तम साथीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या टी-२० सामन्यात १९४ धावांपर्यंत मजल मारली. भारताला हा सामना जिंकण्यासाठी १९५ धावांचं आव्हान मिळालं आहे. भारतीय संघाने आजच्या सामन्यात क्षेत्ररक्षणात निराशाजनक कामगिरी केली. परंतू मोक्याच्या षटकांमध्ये कांगारुंना मोठे फटके खेळण्यापासून रोखण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं. परंतू डेथ ओव्हर्समध्ये फटकेबाजी करुन ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा सामन्याचं पारडं आपल्या बाजूने फिरवलं. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार वेडने ५८ तर स्मिथने ४६ धावांचं योगदान दिलं. नाणेफेक जिंकत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फिंचच्या जागेवर ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणाऱ्या मॅथ्यू वेडने धडाकेबाज सुरुवात करत भारतावर दबाव आणायला सुरुवात केली. मॅथ्यू वेड आणि डार्सी शॉर्ट या फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी केली. अखेरीस नटराजनने डार्सी शॉर्टला माघारी धाडत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. यानंतर कर्णधार वेडने स्मिथच्या साथीने छोटेखानी भागीरादीर करत संघाचा डाव सावरला. यादरम्यान वेडने आपलं अर्धशतकही साजरं केलं. परंतू वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर मैदानात उडालेल्या गोंधळता वेड धावबाद झाला. त्याने ३२ चेंडूत १० चौकार आणि एका षटकारासह ५८ धावा केल्या.

यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि स्टिव्ह स्मिथ यांनी फटकेबाजीला सुरुवात करत भारतावर दबाव आणायला सुरुवात केली. परंतू शार्दुलने मॅक्सवेलला माघारी धाडत भारताला महत्वाची विकेट मिळवून दिली, त्याने २२ धावा केल्या. भारतीय खेळाडूंनी दुसऱ्या टी-२० सामन्यात गलथान क्षेत्ररक्षण केलं. ज्याचा फायदा ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी धेतला. फटकेबाजी करणारा स्टिव्ह स्मिथही चहलच्या गोलंदाजीवर माघारी परतला. त्याने ३८ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ४६ धावा केल्या. भारताकडून नटराजनने दोन तर शार्दुल ठाकूर आणि चहल यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

Live Blog

17:26 (IST)06 Dec 2020
अखेरच्या दोन षटकांत भारताला विजयासाठी २५ धावांची गरज

हार्दिक पांड्याची सिडनीच्या मैदानावर तुफान फटकेबाजी....आव्हान पूर्ण करत भारताची ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून मात३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारताची २-० ने विजयी आघाडी, नाबाद ४४ धावांची खेळी करणारा पांड्या सामनावीर पुरस्काराचा मानकरी

17:02 (IST)06 Dec 2020
भारताला मोठा धक्का, फॉर्मात आलेला विराट कोहली माघारी

डॅनिअल सम्सच्या गोलंदाजीवर वाईड जात असलेल्या बॉलवरही विराटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटची कड घेऊन यष्टीरक्षक वेडच्या हातात

२४ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह विराटची ४० धावांची खेळी

16:47 (IST)06 Dec 2020
भारताला तिसरा धक्का, संजू सॅमसन माघारी

फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात संजू सॅमसनची हाराकिरी, स्वेप्सनच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका खेळण्याच्या प्रयत्नात सॅमसन झेलबाद

सीमारेषेवर स्मिथने घेतला सॅमसनचा झेल, केवळ १५ धावा करत सॅमसन माघारी

16:41 (IST)06 Dec 2020
अर्धशतकी खेळीसह शिखर धवनचा आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये विक्रम

डावखुऱ्या फलंदाजांच्या यादीत पटकावलं अव्वल स्थान, जाणून घ्या सविस्तर...

16:36 (IST)06 Dec 2020
भारताला दुसरा धक्का, शिखर धवन माघारी

जमलेली जोडी फोडण्यात ऑस्ट्रेलियाला यश, झॅम्पाच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका खेळण्याच्या प्रयत्नात धवन बाद

३६ चेंडूतच ४ चौकार आणि २ षटकार लगावत धवनच्या ५२ धावा

16:09 (IST)06 Dec 2020
आश्वासक सुरुवातीनंतर भारतीय संघाला पहिला धक्का, लोकेश राहुल बाद

पुढे येऊन मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात राहुल सीमारेषेवर  स्वेप्सनने घेतला झेल

अँड्रू टायने मिळवून दिला ऑस्ट्रेलियाला महत्वाचा ब्रेक-थ्रू, ३० धावांची खेळी करत लोकेश राहुल माघारी

16:07 (IST)06 Dec 2020
शिखर धवन आणि लोकेश राहुल जोडीची आक्रमक फटकेबाजी

ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा समाचार घेत पहिल्या षटकापासून सुरु केली फटकेबाजी, अर्धशतकी भागीदारी करत भारतीय संघाला करुन दिली खणखणीत सुरुवात

15:24 (IST)06 Dec 2020
चहलसाठी एका डोळ्यात आसू तर दुसऱ्या डोळ्यात हसू अशी परिस्थिती
15:20 (IST)06 Dec 2020
अखेरच्या षटकातही कांगारुंची फटकेबाजी

निर्धारित षटकांत ऑस्ट्रेलियाची १९४ धावांपर्यंत मजल, भारताला विजयासाठी १९५ धावांचं आव्हान

15:12 (IST)06 Dec 2020
कांगारुंना पाचवा धक्का, हेन्रिकेज माघारी

टी. नटराजनच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक लोकेश राहुलने घेतला झेल, २६ धावांची खेळी करुन हेन्रिकेज माघारी परतला

15:10 (IST)06 Dec 2020
मोक्याच्या क्षणी भारताला महत्वाचं यश
15:08 (IST)06 Dec 2020
फटकेबाजी करणाऱ्या स्टिव्ह स्मिथला माघारी धाडण्यात भारताला यश

युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात स्मिथ माघारी, सीमारेषेवर हार्दिक पांड्याने घेतला सुरेख झेल

३८ चेंडूत ४६ धावांची खेळी करुन स्मिथ माघारी परतला

14:44 (IST)06 Dec 2020
शार्दुल ठाकूरने फोडली ऑस्ट्रेलियाची जमलेली जोडी

तेराव्या षटकात शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर लागोपाठ दोन चौकार लगावत स्मिथची धडाकेबाज सुरुवात. मॅक्सवेल स्ट्राईकवर आल्यानंतर शार्दुलकडून रणनितीत बदल, स्लोअर वन चेंडूवर मॅक्सवेल फसला, वॉशिंग्टन सुंदरने घेतला सोपा झेल.

१३ चेंडूत २ षटकारांसह २२ धावांची खेळी करत मॅक्सवेल माघारी परतला

14:26 (IST)06 Dec 2020
अर्धशतकवीर मॅथ्यू हेड नाट्यमय घडामोडीनंतर बाद

वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर पुढे येऊन खेळण्याच्या प्रयत्नात अतिरीक्त बाऊंसमुळे वेड फसला...बॅटची कड लागून बॉल हवेत...परंतू विराटने मॅथ्यूचा सोपा झेल सोडला. परंतू या गोंधळात एक चोरटी धाव काढण्याच्या प्रयत्नात वेड आणि स्मिथ यांच्यात गोंधळ. अखेरीस वेडला धावबाद करण्यात भारताला यश

३२ चेंडूत १० चौकार आणि एका षटकारासह वेडच्या ५८ धावा

14:20 (IST)06 Dec 2020
अर्धशतकी खेळीदरम्यान मॅथ्यू वेडची आपल्याच विक्रमाशी बरोबरी

जाणून घ्या...

14:16 (IST)06 Dec 2020
कर्णधार मॅथ्यू वेडचं अर्धशतक, सामन्यावर ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व

डार्सी शॉर्ट माघारी परतल्यानंतरही वेडची फटकेबाजी सुरुच, अर्धशतक झळकावत संघाची बाजू केली वरचढ

14:11 (IST)06 Dec 2020
ऑस्ट्रेलियाने ओलांडला ५० धावसंख्येचा टप्पा

मॅथ्यू वेडची स्टिव्ह स्मिथच्या साथीने फटकेबाजी सुरुच

14:05 (IST)06 Dec 2020
अखेरीस ऑस्ट्रेलियाची जमलेली जोडी फोडण्यात भारताला यश, डार्सी शॉर्ट माघारी

टी. नटराजनच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात शॉर्ट फसला. सीमारेषेवर उभ्या असलेल्या श्रेयस अय्यरने घेतला शॉर्टचा सुरेख झेल

अवघ्या ९ धावा काढत शॉर्ट माघारी परतला, भारताला पहिलं यश

13:59 (IST)06 Dec 2020
ऑस्ट्रेलियाची आक्रमक सुरुवात, मॅथ्यू वेडची फटकेबाजी

भारतीय गोलंदाजांची पहिल्या षटकापासून धुलाई करत ऑस्ट्रेलियाची आक्रमक सुरुवात, कर्णधारपदाची सूत्र सांभाळणाऱ्या मॅथ्यू वेडची आश्वासक सुरुवात

13:23 (IST)06 Dec 2020
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचही दुखापतग्रस्त, मॅथ्यू वेडकडे संघाचं नेतृत्व

जाणून घ्या ऑस्ट्रेलियाच्या संघात झालेले बदल

13:23 (IST)06 Dec 2020
भारतीय संघामध्ये ३ बदल, जाणून घ्या कशी आहे दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया
13:22 (IST)06 Dec 2020
दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली

कर्णधार विराट कोहलीचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय