न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी केलेल्या शिस्तबद्ध माऱ्यामुळे पहिल्या टी-20 सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. न्यूझीलंडने दिलेलं 220 धावांचं आव्हान पार करताना भारताचा डाव पुन्हा कोलमडला. 19.2 षटकात भारतीय संघ फक्त 139 धावांपर्यंत मजल मारु शकला. कर्णधार रोहित शर्मा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या हे सर्व फलंदाज आज अपयशी ठरले. शिखर धवन, विजय शंकर, महेंद्रसिंह धोनी यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. अखेरीस 80 धावांनी विजय मिळवत न्यूझीलंडने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने सर्वाधिक 3 बळी घेतले.

त्याआधी, सलामीवीर कॉलिन मुनरो आणि टीम सिफर्ट यांनी केलेल्या धडाकेबाज अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडने भारतासमोर 220 धावांचं आव्हान ठेवलं. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा रोहित शर्माचा निर्णय काहीसा फसला. मुनरो आणि सिफर्ट या दोन्ही फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीवर जोरदार हल्लाबोल चढवला. न्यूझीलंड धावांचा डोंगर उभा करणार असं वाटत असतानाच कृणाल पांड्याने कॉलिन मुनरोला माघारी धाडत न्यूझीलंडला पहिला धक्का दिला.

मुनरो माघारी परतल्यानंतरही सिफर्टने आपली फटकेबाजी सुरुच ठेवली. या खेळीदरम्यान त्याने आपलं अर्धशतक साजरं केलं. कर्णधार विल्यमसनच्या साथीने सिफर्टने 43 चेंडूत 84 धावा पटकावल्या. खलिल अहमदने सिफर्टचा अडसर दूर केल्यानंतर मधल्या फळीतल्या फलंदाजांनी धावसंख्येत आपापल्यापरीने भर घातली. अखेर 20 षटकात न्यूझीलंडने 6 गड्यांच्या मोबदल्यात 219 धावांपर्यंत मजल मारली.

भारताच्या सर्व गोलंदाजांना आजच्या सामन्यात यश मिळालं. मात्र न्यूझीलंडच्या धावगतीवर नियंत्रण ठेवणं त्यांना जमलं नाही. हार्दिक पांड्याने 2 फलंदाजांना माघारी धाडलं. तर भुवनेश्वर कुमार, खलिल अहमद, युजवेंद्र चहल आणि कृणाल पांड्याने प्रत्येकी 1-1 बळी घेतला.

Live Blog

15:53 (IST)06 Feb 2019
भारताचा अखेरचा फलंदाज माघारी, न्यूझीलंड पहिल्या सामन्यात विजयी

युझवेंद्र चहल त्रिफळाचीत, न्यूझीलंड 80 धावांनी विजय

मालिकेत 1-0 ने आघाडी

15:44 (IST)06 Feb 2019
महेंद्रसिंह धोनी बाद, भारताचा नववा गडी माघारी

टीम साऊदीला आणखी एक बळी

15:39 (IST)06 Feb 2019
भारताला आठवा धक्का, भुवनेश्वर कुमार बाद

लॉकी फर्ग्युसनने घेतला बळी, भारताची पराभवाच्या दिशेने वाटचाल

15:37 (IST)06 Feb 2019
भारताला सातवा धक्का, कृणाल पांड्या झेलबाद

टीम साऊदीने घेतला बळी

15:13 (IST)06 Feb 2019
भारताला सहावा धक्का, हार्दिक पांड्या माघारी

इश सोधीला दुसरी विकेट, भारताची दाणादाण

15:12 (IST)06 Feb 2019
भारताला पाचवा धक्का, दिनेश कार्तिक माघारी

इश सोधीच्या गोलंदाजीवर टीम साऊदीने घेतला झेल

15:00 (IST)06 Feb 2019
त्याच षटकात मोठा फटका खेळण्याच्या नादात विजय शंकर माघारी

कॉलीन डी-ग्रँडहोमने घेतला झेल, भारताला चौथा धक्का

14:59 (IST)06 Feb 2019
भारताला तिसरा धक्का, ऋषभ पंत माघारी

मिचेल सँटनरने उडवला पंतचा त्रिफळा

14:46 (IST)06 Feb 2019
शिखर धवन त्रिफळाचीत, भारताला दुसरा धक्का

लॉकी फर्ग्युसनने उडवला धवनचा त्रिफळा

14:30 (IST)06 Feb 2019
भारताची अडखळती सुरुवात, रोहित शर्मा माघारी

टीम साऊदीच्या गोलंदाजीवर झेल देत भारताचा पहिला फलंदाज तंबूत परतला

14:09 (IST)06 Feb 2019
न्यूझीलंडची 219 धावांपर्यंत मजल, भारताला 220 धावांचं आव्हान

न्यूझीलंडच्या फलंदाजांकडून भारतीय गोलंदाजीचा समाचार

13:57 (IST)06 Feb 2019
लागोपाठ रॉस टेलर बाद, न्यूझीलंडला सहावा धक्का

भुवनेश्वर कुमारने घेतला बळी

13:56 (IST)06 Feb 2019
न्यूझीलंडला पाचवा धक्का, कॉलिन डी-ग्रँडहोम माघारी

मोठा फटका खेळण्याच्या नादात डी-ग्रँडहोम बाद, पांड्याने घेतला बळी

13:41 (IST)06 Feb 2019
कर्णधार विल्समयन माघारी, न्यूझीलंडला चौथा धक्का

युजवेंद्र चहलने घेतला बळी

13:40 (IST)06 Feb 2019
न्यूझीलंडला तिसरा धक्का, डॅरेल मिचेल माघारी

हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर सीमारेषेवर दिनेश कार्तिकने पकडला मिचेलचा झेल

13:26 (IST)06 Feb 2019
धडाकेबाज खेळी करणारा सिफर्ट माघारी, खलिल अहमदने उडवला त्रिफळा

सिफर्टची 43 चेंडूत 84 धावांची खेळी, 6 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश

13:13 (IST)06 Feb 2019
टीम सिफर्टचं अर्धशतक

मुनरो माघारी परतल्यानंतर सिफर्टने एका बाजूने फटकेबाजी करत आपल्या अर्धशतकाला गवसणी घातली आहे.

13:09 (IST)06 Feb 2019
न्यूझीलंडला पहिला धक्का, कॉलिन मुनरो माघारी

कृणाल पांड्याच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या नादात मुनरो झेलबाद. विजय शंकरने घेतला झेल

12:53 (IST)06 Feb 2019
न्यूझीलंड सलामीवीरांची आक्रमक सुरवात

टीम सिफर्ट आणि कॉलिन मुनरो यांनी धडाकेबाज सुरुवात करत आपल्या संघाला 50 धावांचा टप्पा ओलांडून दिला आहे

12:08 (IST)06 Feb 2019
भारतीय संघात 3 यष्टीरक्षकांना स्थान, केदार जाधवला विश्रांती
12:07 (IST)06 Feb 2019
भारताने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

वन-डे मालिकेनंतर भारताच्या राखीव फळीला टी-20 मालिकेत स्थान