२०१७ सालात घरच्य मैदानावर खेळणाऱ्या टीम इंडियाने अनेक विक्रमांची नोंद केली. कसोटी, वन-डे किंवा टी-२० क्रिकेट स्पर्धेत भारताने अनेक तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांना पराभवाचं पाणी पाजलं. मात्र नवीन वर्षात भारताची सुरुवातच पराभवाने झाली आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारताने ३ सामन्यांची कसोटी मालिका गमावली आहे. केप टाऊन कसोटीपाठोपाठ सेंच्युरिअन कसोटीमध्येही भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या माऱ्यासमोर कोलमडला. दुसऱ्या कसोटीत भारताला तब्बल १३५ धावांनी पराभव पत्करावा लागला.

मालिका गमावलेली असली तरीही भारताने सेंच्युरिअन कसोटी सामन्यात तब्बल ७ विक्रम आपल्या नावावर केले आहेत. या मालिकेतला अखेरचा सामना २४ जानेवारीपासून जोहान्सबर्ग येथे खेळवण्यात येणार आहे.

१ – एका कसोटी सामन्यात दोन्ही डावांमध्ये धावबाद होणारा चेतेश्वर पुजारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.

१ – भारताचा कसोटी कर्णधार या नात्याने विराट कोहलीने गमावलेली ही पहिली मालिका ठरली आहे.

१- १९८४ सालानंतर भारताने पहिल्यांदाज १०० धावांच्या आत ७ गडी गमावले. केप टाऊन कसोटीत भारताची धावसंख्या ९२/७ तर दुसऱ्या डावात ८२/७ अशी होती. सेंच्युरिअन कसोटीतही अशाच धावसंख्येची पुनरावृत्ती होताना पहायला मिळाली. आफ्रिकेने दिलेल्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताची अवस्था ८७/७ अशी झाली होती.

५ – भारताविरुद्ध सामन्यात पदार्पण करुन सामनावीराचा किताब पटकावणारा लुंगी निगडी हा पाचवा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू ठरला आहे.

६ – १९९२-९२ सालापासून ७ पैकी भारताने गमावलेला हा सहावा कसोटी सामना ठरला. २०१०-११ सालात भारतीय संघ आफ्रिकेविरुद्ध एकमेव कसोटी सामना अनिर्णित राखण्यात यशस्वी ठरला होता.

६ – कसोटी पदार्पणात सामनावीराचा किताब पटकावणारा लुंगी निगडी हा सहावा आफ्रिन खेळाडू ठरला आहे.

४७ – कसोटी सामन्यात चौथ्या डावात ४७ ही रोहित शर्माची सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. याचसोबत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रोहितची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे.