भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना शुक्रवारपासून नागपूरच्या मैदानात रंगणार आहे. या सामन्यात भारतीय संघ आघाडी मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. शिखर धवन आणि भूवनेश्वरच्या अनुपस्थितीत विराट कोहली ‘प्लेइंग इलेव्हन’मध्ये कोणाला संधी देणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल. याशिवाय अजिंक्य राहणेची कामगिरी बहरणार का? हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

पहिल्या डावात शून्यावर बाद झाल्यानंतर विराट कोहलीने दुसऱ्या डावात दमदार शतक करत भारतीय फलंदाजीतील ताकद दाखवून दिली. त्यानंतर आता रहाणेला आपल्या फलंदाजीतील कसब पणाला लावण्याची गरज आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात अजिंक्य रहाणे पहिल्या डावात ४ तर दुसऱ्या डावात शून्यावर बाद झाला होता. रहाणे हा भारतीय फलंदाजीतील महत्त्वाचे अस्त्र आहे. त्यामुळे मालिकेत आघाडी मिळवण्यासाठी त्याचा खेळ बहरणे भारतासाठी फायदेशीर ठरेल.
मागील १२ कसोटी सामन्यात रहाणेनं ३३.५५ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. यात तीन अर्धशतकासह एका शतकाचा समावेश आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील अपयश रहाणेला दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी डोकेदुखी ठरु शकते. पहिल्या सामन्यातील अपयशाकडे कानाडोळा करुन दुसऱ्या सामन्यात तो कशी कामगिरी करतो याकडे लक्ष्य असेल. श्रीलंकाविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे रहाणेला आपल्या फलंदाजीतील कसब दाखवून स्वत:ला सिद्ध करावे लागेल.

पहिल्या कसोटी सामन्यात भारताची कामगिरी श्रीलंकेपेक्षा चांगली झाली. या सामन्यातील कामगिरीच्या जोरावर भारतीय संघ नागपूरच्या मैदानात आत्मविश्वासाने मैदानात उतरेल. नागपूरच्या मैदानात नाणेफेक जिंकणे देखील महत्त्वाचे ठरु शकते. कोलकाताप्रमाणे श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारल्यास सुरुवातीला सुरंगा भारतीय फलंदाजांसाठी घातक ठरु शकतो.