बॉर्डर-गावसकर मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताला विजयासाठी ४०७ धावांचं आव्हान दिलं आहे. पहिल्या डावात ९४ धावांची आघाडी घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियानं आपला दुसरा डाव ३१२ धावांवर घोषीत केला. तिसऱ्या दिवसाप्रमाणेच चौथ्या दिवशीही भारतीय संघानं गचाळ क्षेत्ररक्षण करत झेल सोडले. त्यामुळे गचाळ क्षेत्ररक्षणाचा फटका भारतीय संघाला बसला. स्मिथ, ग्रीन आणि लाबुशेन यांना भारतीय खेळाडूंनी जीवनदान दिल्यामुळे ऑस्ट्रेलियानं भारतासमोर डोंगराएवढं आव्हान ठेवलं आहे.

गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात भारताला रविंद्र जाडेजाची कमी जाणवत होती. पहिल्या डावात फलंदाजी करताना जाडेजाच्या बोटाला दुखपत झाल्यामुळे बॉर्डर-गावसकर मालिकेला मुकणार आहे. त्यामुळे दुसऱ्या डावात फलंदाजी करतानाही भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. सामना वाचवण्यासाठी भारतीय फलंदाजांना दीड दिवस ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा सामना करावा लागणार आहे. डोंगराएवढ्या आव्हानाचा सामना करताना भारतीय संघ कशी फलंदाजी करतोय, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

सिडनी कसोटीच्या तिसऱ्या दिवसावर कांगारुंनी वर्चस्व मिळवलं होतंच. आज चौथ्या दिवशी त्यांनी सामन्यावर चांगलीच पकड मिळवली आहे. सकाळच्या सत्रात काल नाबाद राहिलेल्या मार्नस लाबूशेन आणि स्टिव्ह स्मिथ या दोघांनी अर्धशतकं झळकावून ऑस्ट्रिलियाची धावसंख्या वाढवली. कॅमरुन ग्रीन (८४), स्मिथ (८१) आणि लाबुशेन (७३) यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर सहा गड्यांच्या मोबदल्यात ३१२ धावा चोपल्या. भारताकडून सैनी आणि अश्विन यांनी प्रत्येकी दोन – दोन बळी घेतले. तर सिराज आणि अश्विनला प्रत्येकी एक-एक बळी मिळवता आला.