21 January 2021

News Flash

ब्रिस्बेनमधील टाळेबंदीमुळे चौथी कसोटी पुन्हा संकटात

‘बीसीसीआय’ची मागणी योग्यच - गावस्कर

करोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळे ब्रिस्बेन शहरात तीन दिवसांची कठोर टाळेबंदी लागू करण्यात आल्याने भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटीच्या आयोजनावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुरुवारीच ब्रिस्बेनमधील नियम शिथिल करण्याबाबतचे पत्र ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ मंडळाला दिले, परंतु या घटनेच्या २४ तासांच्या आतच ब्रिस्बेनमधील नव्या टाळेबंदीने समस्या निर्माण केली आहे. शहरातील एका हॉटेलमधील कर्मचाऱ्यास नव्या प्रकारचा करोना झाल्याने खबरदारी म्हणून ही टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. त्याशिवाय ब्रिस्बेनचा समावेश असलेल्या क्वीन्सलँड राज्यातही या पाश्र्वभूमीवर कठोर नियम लागू करण्यात आले आहेत.

ब्रिस्बेनच्या विलगीकरणाच्या नियमानुसार खेळाडूंना दिवसाचा खेळ संपल्यानंतर हॉटेलमधील खोलीच्या बाहेर निघण्यासही मनाई आहे. नाइलाजास्तव ब्रिस्बेन येथे चौथ्या कसोटीचे आयोजन करणे अशक्य झाल्यास सिडनीलाच मालिकेतील अखेरची कसोटीही खेळवण्यात येईल, असे ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ने यापूर्वी स्पष्ट केले आहे. १५ जानेवारीपासून चौथ्या कसोटीला प्रारंभ होणार आहे.

‘बीसीसीआय’ची मागणी योग्यच – गावस्कर

ज्याप्रमाणे क्वीन्सलँड राज्य शासन त्यांच्या नागरिकांची काळजी घेण्यासाठी कठोर नियम लागू करीत आहेत, त्याचप्रमाणे ‘बीसीसीआय’देखील भारतीय खेळाडूंच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्यासाठी बांधील आहे. त्यामुळे खेळाडूंचा विचार करून ‘बीसीसीआय’ने केलेली नियमांच्या शिथिलीकरणाची मागणी गैर नाही, असे मत भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले. ‘‘करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ब्रिस्बेनमधील टाळेबंदीचे महत्त्व आपण समजू शकतो, परंतु भारताच्या खेळाडूंनी दिवसातील किमान ९-१० तास मैदानावर घालवल्यावर त्यांना हॉटेलमध्ये एकमेकांसह वेळ घालवणे संघहिताच्या दृष्टीने गरजेचे आहे. ‘बीसीसीआय’ला आपल्या खेळाडूंची काळजी असणे स्वाभाविक आहे. त्यामुळे किमान हॉटेलमध्ये खेळाडूंवर मर्यादा घालू नयेत,’’ असे गावस्कर म्हणाले. त्याशिवाय खेळाडूंवर बंधने लादण्यापेक्षा स्टेडियममध्ये येणाऱ्या प्रेक्षकांकडे बारकाईने लक्ष द्यावे, असेही गावस्करांनी सुचवले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2021 2:08 am

Web Title: india vs australia 4th test 2021 mppg 94
Next Stories
1 टोक्यो ऑलिम्पिकचे आयोजन अशक्य!
2 भारतासाठी ‘शुभ’वर्तमान!
3 राष्ट्रीय क्रीडा संहितेचे पालन करणाऱ्या संघटनांनाच मान्यता
Just Now!
X