ऑस्ट्रेलियाचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळण्यामध्ये महत्वाची भूमिका निभावणाऱ्या ऋषभ पंतने हा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण असल्याचं म्हटलं आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिकेच्या चौथ्या आणि अखेरच्या सामन्यात तीन गडी राखून विजय मिळवला. गाबाच्या मैदानावर १९८८ नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया संघाला पराभवाचा सामना करावा लागला. चार सामन्यांच्या मालिकेत २-१ ने मालिका जिंकत भारताने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. यामध्ये ऋषभ पंतने मोलाची भूमिका निभावली.

विराटनं रचला पाया, अजिंक्यनं चढवला कळस – रवी शास्त्री

“हा माझ्या आयुष्यातील अनेक मोठ्या क्षणांपैकी एक आहे. मी खेळत नसतानाही सपोर्ट स्टाफ आणि सहकाऱ्यांना मला पाठिंबा दिल्याचा आनंद आहे,” असं ऋषभ पंतने म्हटलं आहे. भारताने ऋषभ पंतला एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत संधी दिली नव्हती. मात्र सिडनीच्या कसोटी सामन्यात ९७ धावा आणि गाबाच्या मैदानावर नाबाद ८९ धावा करत त्याने आपली छाप उमटवली.

भारताच्या पराभवाचं भाकीत वर्तवणाऱ्या क्लार्क, पाँटिंग, वॉला आनंद महिंद्रांचा टोला; म्हणाले…

“ही एक ड्रीम सीरिज होती. संघ व्यवस्थापनाने मला नेहमी पाठिंबा दिला आणि तू एक मॅचविनर असल्याचं सांगत राहिले. मैदानात जाऊन तुला संघासाठी सामना जिंकायचा आहे असं ते वारंवार सांगत होते. प्रत्येक दिवशी भारताला सामने जिंकून देण्याचा विचार करत असतो आणि आज मी ते करुन दाखवलं,” अशा शब्दांत ऋषभ पंतने आनंद व्यक्त केला आहे. “खेळाचा पाचवा दिवस होता आणि बॉल थोड्या प्रमाणात वळत होता. त्यामुळे मी फटका मारताना शिस्तीने मारण्याचा विचार केला,” असं ऋषभ पंतने सांगितलं.