चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात खराब झाली. चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार अजिंक्य रहाणे ही अनुभवी जोडी पहिल्या सत्रात माघारी परतली आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या सर्व आशा ऋषभ पंत आणि मयांक अगरवाल यांच्यावर आहे. पहिल्या सत्रानंतर भारतीय संघानं ४ गड्यांच्या मोबदल्यात १६१ धावा केल्या आहेत. तिसऱ्या दिवासाच्या पहिल्या सत्रात भारतीय संघानं ३४ षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात ९९ धावा केल्या. दुसऱ्या सत्राच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर मयांक अगरवालनं ३८ धावांवर आपली विकेट फेकली. त्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला आहे. भारतीय संघ अद्याप २०० धावांनी पिछाडीवर आहे.

चेतेश्वर पुजाराला जोश हेजलवूडनं सुरेख चेंडूवर यष्टीरक्षक टिम पेनकरवी झेलबाद केलं. पुजारानं २५ धावांची खेळी केली. पुजारा बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणेही लगेच तंबूत परतला. रहाणेनं स्टार्कच्या चेंडूवर चुकीचा फाटका मारत मॅथ्यू वेडकडे झेल देत माघारी परतला. रहाणेनं ३७ धावांची खेळी केली. अनुभवी फलंदाज माघीर परतल्यानंतर भारतीय संघाच्या फलंदाजीची सर्व मदार ऋषभ पंत आणि सुंदर या युवा जोडीवर आहे.

ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी भागिदारीवर लक्ष दिलं होतं. ऑस्ट्रेलियाकडून एक शतकी आणि दोन अर्धशतकी भागिदाऱ्या झाल्या आहेत. त्याउलट भारतीय संघाची अद्याप एकही अर्धशतकी भागिदारी झालेली नाही. भारतीय संघाकडून दुसऱ्या विकेटसाठी रोहित-पुजारा यांच्यात झालेली ४९ धावांची भागिदारी सर्वोत्तम आहे.

भारताच्या नवख्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ३६९ धावांत रोखण्याची किमया साधली. परंतु चुकीचा फटका खेळून रोहित शर्मा बाद झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाचे चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पारडे जड मानले जात आहे. शनिवारी चहापानानंतर पावसामुळे खेळ होऊ शकला नाही. भारताने तोवर २ बाद ६२ अशी मजल मारली होती. भारताची सुरुवात खराब झाली. पॅट कमिन्सने शुभमन गिलचा (७) अडसर दूर केला. पण सलामीवीर रोहितने दिमाखदार प्रारंभ करीत ७४ चेंडूंत सहा चौकारांसह ४४ धावा केल्या. त्याने चेतेश्वर पुजाराच्या साथीने दुसऱ्या गड्यासाठी ४९ धावांची भागीदारी केली. शंभरावी कसोटी खेळणाऱ्या नॅथन लायनने मिचेल स्टार्ककरवी रोहितला झेलबाद करीत अर्धशतकापासून रोखले.