आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ पहिल्या सामन्यासाठी सज्ज

कॅनबेरा : इंडियन प्रीमियर लीगमधून (आयपीएल) नुकतीच ट्वेन्टी-२० क्रिकेटची मजा लुटल्यानंतर आता भारत-ऑस्ट्रेलिया या बलाढय़ संघांमधील ट्वेन्टी-२० क्रिकेटचे मनोरंजन क्रिकेटरसिकांना अनुभवता आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये जाणवलेली पर्यायांची कमतरता ही अडचण ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये भारतापुढे नक्कीच नाही. त्यामुळेच तीन ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेतील शुक्रवारी होणाऱ्या पहिल्या सामन्यात भारताकडून ऑस्ट्रेलियापुढे कडव्या आव्हानाची अपेक्षा आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या एकदिवसीय मालिकेत भारताने १-२ अशी हार पत्करली होती. यातून बरेच धडे घेता येण्याजोगे असले तरी ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडे समतोल संघ असल्यामुळे ही लढत अधिक रंगतदार होईल. यावर्षांच्या सुरुवातीला भारताने न्यूझीलंड दौऱ्यात पाच सामन्यांची ट्वेन्टी-२० मालिका जिंकली होती, हे भारतासाठी सकारात्मक ठरेल.

दुसरीकडे, दुखापतींचा ससेमिरा पाठी लागला असला तरी एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. ट्वेन्टी-२० साठी यजमानांनी एकदिवसीय संघातील खेळाडूंनाच कायम ठेवले आहे.

मॅक्सवेल लयीत

लयीत असणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलकडून फलंदाजीत फटकेबाजीची सर्वात मोठी अपेक्षा आहे. मॅक्सवेलने एकदिवसीय मालिकेत १६७ धावा फटकावल्या आहेत. मात्र मॅक्सवेल ‘आयपीएल’मध्ये एकही षटकार फटकावू शकला नव्हता. धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर दुखापतीमुळे मुकणार असला तरी कर्णधार आरोन फिंचच्या साथीला मार्नस लबूशेन सलामीला येण्याची शक्यता आहे. मार्कस स्टॉइनिसदेखील सलामीसाठी यजमानांसमोर पर्याय आहे. मात्र एकदिवसीय मालिकेत झालेल्या दुखापतीमुळे सलामीला स्टॉइनिसला पाठवण्यात येण्याची शक्यता कमी आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला बुधवारी तिसऱ्या एकदिवसीय लढतीतून विश्रांती देण्यात आली होती. मात्र तो पुन्हा झोकात पुनरागमन करेल अशीच यजमानांना अपेक्षा आहे.

आकडेवारी

११ – भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकूण २० ट्वेन्टी-२० लढती झाल्या आहेत. मात्र त्यात भारताने सर्वाधिक ११ लढतींत विजय मिळवला आहे.

नवीन जर्सी

ऑस्ट्रेलिया संघाने स्वदेशी बनावटीची नवीन जर्सी ट्वेन्टी-२० मालिकेसाठी बनवली आहे. त्यामुळे स्वदेशी बनावटीच्या आगळ्यावेगळ्या रंगात ऑस्ट्रेलियाचे खेळाडू दिसतील.

कमिन्सला वगळल्याने ब्रेट ली नाराज

गोलंदाजांमध्ये पॅट कमिन्सला दोन एकदिवसीय लढतीनंतरच विश्रांती देण्यात आली आहे. ‘‘व्यग्र वेळापत्रक पाहून कमिन्सला विश्रांती दिली असली तरी जेव्हा गोलंदाज भरात असतात तेव्हा त्यांना खेळवायचे असते. स्वत: कमिन्सलादेखील खेळायची इच्छा असेल. दोन लढती खेळून गोलंदाज कधीच थकत नसतात,’’ असे ली याने म्हटले.

नटराजनचे पदार्पण?

फिरकी आणि वेगवान गोलंदाजीला साथ देणाऱ्या कॅनबेराच्या खेळपट्टीवर जसप्रीत बुमराकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. टी. नटराजनला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय लढतीतून पदार्पणाची संधी मिळाली होती. यॉर्कर चेंडू टाकण्यात हुशार असणाऱ्या नटराजनचे ट्वेन्टी-२० पदार्पण होणेदेखील अपेक्षित आहे. नटराजनसह वाशिंग्टन सुंदर, दीपक चहर या युवा खेळाडूंवर गोलंदाजीची भिस्त आहे.

धवन-राहुलवर सलामीची भिस्त

फलंदाजीमध्ये सलामीला शिखर धवनच्या साथीला के. एल. राहुलला संधी मिळेल हे निश्चित आहे. संपूर्ण ‘आयपीएल’ स्पर्धेत राहुलची फलंदाजी प्रभावी ठरली होती. फलंदाजीत कोहलीवर भिस्त आहेच. जोडीला श्रेयस अय्यरकडूनही मोठी खेळी अपेक्षित आहे. एकदिवसीय मालिकेत पहिल्या दोन लढती गमावल्यावर तिसऱ्या सामन्यात मिळालेला विजय हा ट्वेन्टी-२० मालिकेपूर्वी महत्त्वपूर्ण असल्याचे कोहलीने म्हटले आहेच.

संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयांक अगरवाल, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पंडय़ा, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, टी. नटराजन

ऑस्ट्रेलिया : आरोन फिंच (कर्णधार), सीन अ‍ॅबॉट, अ‍ॅश्टन अ‍ॅगर, अ‍ॅलेक्स कॅरी, कॅमेरुन ग्रीन, जोश हेझलवूड, मोझेस हेन्रिक्स, मार्नस लबूशेन, ग्लेन मॅक्सवेल, डॅनियल सॅम्स, केन रिचर्ड्सन, स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड, आर्सी शॉर्ट, अ‍ॅडम झम्पा.

सामन्याची वेळ : दुपारी १.४० वाजल्यापासून

थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स, सोनी टेन ३