बांगलादेशविरुद्धच्या महत्वाच्या सामन्यामध्ये भारताचा सलामीवीर रोहित शर्माने शानदार शतकी खेळी केली. ९२ चेंडूच्या आपल्या खेळीमध्ये रोहितने ७ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने १०४ धावा केल्या. या खेळीमध्ये रोहितने मालिकेतील चौथे शतक ठोकले. एकाच विश्वचषक स्पर्धेमध्ये चार शतके ठोकणारा रोहित हा पहिला भारतीय ठरला आहे. याआधी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. तर एकाच विश्वचषक स्पर्धेत चार शतके करण्याच्या विक्रमाची बरोबर केली आहे. एकाच विश्वचषक स्पर्धेत चार शतके करण्याच विक्रम श्रीलंकेच्या कुमार संगकाराच्या नावे आहे. मात्र हे शतक ठोकताना रोहितला नशिबाची पुन्हा एकदा साथ मिळाली. रोहित नऊ धावांवर खेळत असताना तमीम इक्बालने त्याला जीवदान दिले. हेच जीवनदान नंतर बांगलादेशच्या संघाला महागात पडले आणि रोहितने स्पर्धेतील चौथे शतक झळकवले. याधाही रोहितला जेव्हा जेव्हा जीवनदान मिळाले तेव्हा ते विरोधी संघाला महागात तर पडलेच शिवाय रोहितने जीवनदान मिळालेल्या चार पैकी तीन सामन्यात शतक तर एका सामन्यात अर्धशतक झळकावले.

आजच्या सामन्यामध्ये रोहितला नऊ धावांवर असताना जीवनदान मिळाले. यानंतर रोहितने अवघ्या ४५ चेंडूत आपले अर्धशतक झळकावले. पुढील ४५ चेंडूंमध्ये त्याने स्पर्धेतील चौथे शकत पूर्ण केले. या आधी झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यामध्ये रोहित चार धावांवर खेळत असताना त्याला जीवनदान मिळाले होते. या सामन्यात त्याने १०४ धावांची खेळी केली होती. त्याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यामध्ये नेथन कॉर्ल्टल-नीलने रोहित दोन धावांवर खेळत असताना त्याला जीवनदान दिले आणि नंतर रोहितने आणखीन ५५ धावा केल्या होत्या. या खेळीत रोहित ५७ धावांवर तंबूत परतला होता. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फलंदाजी करताना डेव्हिड मिलरने रोहित अवघ्या एका धावेवर खेळत असताना त्याचा झेल सोडला होता. या सामन्यात त्याने नाबाद १२२ धावांची खेळी केली होती. असाच प्रकार आज पुन्हा बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात घडला आणि जीवनदान मिळाल्यानंतर रोहितने शतक झळकावले.

दरम्यान या शतकी खेळीमुळे रोहित या विश्वचषकामध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानी विराजमान झाला आहे.