भारतीय संघाने मोहाली कसोटी चौथ्याच दिवशी ८ विकेट्सने जिंकली. इंग्लंडच्या १०३ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना पार्थिव पटेल याने मिळालेल्या संधीचे सोने करत नाबाद ६७ धावांची खेळी साकारली. भारतीय संघाने सामना जिंकल्यानंतर पार्थिव पटेलच्या आक्रमक खेळीचे सर्वांनी कौतुक केले. नेटिझन्सनेही पार्थिव पटेलवर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला आहे. पार्थिव पटेलने आज सेहवागचे रुप धारण केल्याचे एका नेटिझनने म्हटले आहे, तर काही नेटिझन्सनी पार्थिव पटेलने लगावलेल्या शानदार फटक्यांचे कौतुक केले. पार्थिव पटेलने आज आपला दर्जा दाखवून दिल्याचेही अनेकांनी म्हटले आहे.

वृद्धीमान साहाला दुखापत झाल्याने पार्थिव पटेलला भारतीय संघात यष्टीरक्षक म्हणून मोहाली कसोटीत संधी देण्यात आली. पार्थिव पटेलने पहिल्या डावात ४३ धावांची खेळी साकारली होती, तर दुसऱया डावात त्याने अवघ्या ३९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. दुसऱया डावात पार्थिव पटेलने आपल्या नाबाद ६७ धावांच्या खेळीत एकूण ११ चौकार ठोकले, तर एक षटकार देखील लगावला. पार्थिवच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने इंग्लंडचे आव्हान चौथ्याच दिवशी गाठले आणि विजय साजरा केला.