भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेतील चौथा आणि अखेरचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरू आहे. शुक्रवारी कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा हिरो ठरला तो म्हणजे टीम इंडियाचा तरुण यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत.

एकीकडे दिग्गज भारतीय फलंदाज अपयशी ठरत असताना पंतने धडाकेबाज खेळी करत ११८ चेंडूत १०१ धावा केल्या. त्याने वॉशिंग्टन सुंदरच्या मदतीने टीम इंडियाचा डाव सावरला. पंतने वॉशिंग्टनसोबत सातव्या विकेटसाठी ११३ धावांची भागीदारी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपताना भारताची धावसंख्या २९४ धावांवर सात गडी बाद झाली व भारताने ८९ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली.

पंतने आपल्या धडाकेबाज शतकी खेळीत १३ चौकार आणि दोन षटकार ठोकले. या दरम्यान त्याने काही दैदिप्यमान फटकेही मारले. त्याने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला मारलेल्या रिव्हर्स स्विपचं तर सर्वत्र कौतुक होतंय. दुसरा नवीन चेंडू घेतल्यानंतर इंग्लंडच्या कर्णधाराने त्यांच्या संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसनकडे चेंडू सोपवला. पण त्याने टाकलेल्या चेंडूवर रिषभ पंतने चक्क रिव्हर्स स्विप शॉट खेळला. रिव्हर्स स्विप शक्यतो फिरकी गोलंदाजांविरोधात खेळला जातो, पण पंतने अँडरसनविरोधात हा शॉट खेळला आणि चौकार मिळवला. तो शॉट बघून अँडरसनच्याही भुवया उंचावल्या होत्या.


पंतच्या या रिव्हर्स स्विपचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून सेहवाग, जाफर मायकल वॉन अशा अनेक माजी दिग्गज क्रिकेटपटूंनी पंतला कौतुकाची थाप दिली आहे.