इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी संघ जाहीर

मुंबई : कर्णधार हरमनप्रीत कौर घोटय़ाच्या दुखापतीतून अद्याप सावरू न शकल्यामुळे भारताची सलामीवीर स्मृती मानधना हिच्याकडे इंग्लंडविरुद्धच्या तीन ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.

हरमनप्रीत अद्यापही जायबंदी असून ती पुनर्वसन कार्यक्रमात दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. दुखापतीमुळेच हरमनप्रीतला इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतूनही माघार घ्यावी लागली होती. अखिल भारतीय महिला निवड समितीची सोमवारी मुंबईत बैठक झाल्यानंतर ट्वेन्टी-२० मालिकेसाठी संघनिवड करण्यात आली.

मधल्या फळीतील फलंदाज वेदा कृष्णमूर्ती हिने भारतीय संघात पुनरागमन केले आहे. तिला न्यूझीलंडविरुद्धच्या दौऱ्यासाठी भारतीय संघातून वगळण्यात आले होते. आक्रमक फलंदाज भारती फुलमाळी तसेच वेगवान गोलंदाज कोमल झांझड हे दोन नवे चेहरे ट्वेन्टी-२० संघात असतील. हरमनप्रीतच्या जागी एकदिवसीय मालिकेसाठी संघात संधी मिळालेल्या हरलीन देवल हिला चांगली कामगिरी करता आलेली नाही. तरीही तिला संघात कायम ठेवण्यात आले आहे. ट्वेन्टी-२० मालिकेला गुवाहाटी येथे ४ मार्चपासून सुरुवात होणार असून उर्वरित दोन सामने अनुक्रमे ७ मार्च आणि ९ मार्च रोजी गुवाहाटीतच खेळवले जातील.

भारतीय महिला संघ : स्मृती मानधना (कर्णधार), मिताली राज, जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, तानिया भाटिया, भारती फुलमाळी, अनुजा पाटील, शिखा पांडे, कोमल झांझड, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिश्त, राधा यादव, वेदा कृष्णमूर्ती, हरलीन देवल.