पहिल्या दोन कसोटीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर, तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघाने आज ट्रेंट ब्रिजच्या मैदानावर कसून सराव केला. भारत आणि इंग्लंड यांच्यातला तिसरा कसोटी सामना शनिवारपासून सुरु होणार आहे. सध्या भारत ५ सामन्यांच्या मालिकेत २-० ने पिछाडीवर आहे. बीसीसीआयने इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि उमेश यादव याांचा सराव करतानाचा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.

बर्मिंगहॅम कसोटीत हातातोंडाशी आलेल्या विजयावर भारताला पाणी सोडावं लागलं होतं. तर लॉर्ड्स कसोटीत भारताला डावाने पराभव स्विकारावा लागला होता. दुसऱ्या कसोटीत जलदगती गोलंदाजांना खेळपट्टीवर चांगली साथ मिळत होती. ज्याचा जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड आणि ख्रिस वोक्स यांनी चांगला फायदा घेतला. मात्र भारताने या सामन्यासाठी उमेश यादवला विश्रांती देत कुलदीप यादवला संघात जागा दिली. भारतीय संघाने केलेल्या या बदलांवर सर्वच स्तरातून चांगलीच टीका होते आहे.

विराट कोहलीनेही सरावादरम्यानचे आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दुसऱ्या कसोटीत विराटला पाठदुखीचा त्रास जाणवला होता. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत विराट खेळेल की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. मात्र सामना सुरु व्हायच्या दोन दिवस आधी विराटने आपण तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी फिट असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे या कसोटीत भारतीय संघ इंग्लंडला टक्कर देता का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.