चीनची भिंत भेदत दोन दशकांनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला हॉकीमध्ये अंतिम फेरी गाठण्याची किमया साधणारा भारतीय संघ शुक्रवारी जपानला हरवून तब्बल तीन तपांनंतर सुवर्णपदकावर नाव कोरण्यासाठी उत्सुक आहे.

२०१४ च्या इन्चॉन आशियाई स्पर्धेत कांस्यपदक पटकावणाऱ्या भारताने गुरुवारी रोमहर्षक लढतीत चीनचा १-० असा पराभव केला आणि अंतिम फेरी गाठली. याआधी १९९८ च्या बँकॉक आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने अंतिम फेरी गाठली होती. मात्र कोरियाकडून पराभूत झाल्यामुळे उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. महिला हॉकीमध्ये भारताने एकमेव आशियाई सुवर्णपदक १९८२मध्ये दिल्लीत जिंकले होते. आतापर्यंतच्या नऊ आशियाई स्पर्धामध्ये भारतीय महिला संघाने एक सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्य अशी पाच पदकांची कमाई केली आहे.

जागतिक क्रमवारीत भारत नवव्या स्थानावर आहे, तर जपान १४ व्या स्थानावर आहे. त्यामुळे भारताचे या सामन्यात पारडे जड मानले जात आहे. साखळीत अपराजित राहताना भारतीय संघाने  इंडोनेशिया (८-०), कझाकस्तान (२१-०), कोरिया (४-१) आणि थायलंड (५-०) यांना पराभूत केले. या स्पर्धेत भारताचा बचावसुद्धा अप्रतिम होता. आतापर्यंतच्या तीनशे मिनिटांच्या खेळात प्रतिस्पर्धी संघाला फक्त एकमेव गोल नोंदवता आला आहे. दीप ग्रेस एक्का, दीपिका, गुर्जित कौर, सुनीता लाक्रा आणि रीना खोखर यांनी बचाव फळीत महत्त्वाची भूमिका बजावली.

संपूर्ण स्पर्धेतील उत्तम कामगिरीचे श्रेय बचावफळीला द्यायला हवे. फक्त बलाढय़ कोरियाला आमच्याविरुद्ध एकमेव गोल साकारता आला आहे. हीच कामगिरी अंतिम फेरीत खेळताना आमच्यासाठी आत्मविश्वास उंचावणारी आहे.     – शोर्ड मरिन, भारताचे प्रशिक्षक