आशिया चषकात Super 4 गटात भारताने पाकिस्तानवर पुन्हा एकदा मात केली. ९ गडी राखून सामना जिंकत भारतीय संघाने अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चीत केलं आहे. पाकिस्तानने विजयासाठी दिलेलं २३८ धावांचं आव्हान भारताने रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या द्विशतकी भागीदारीच्या जोरावर सहज पूर्ण केलं. या भागीदारीमुळे भारताने पाकिस्तानच्या हातातला सामनाच काढून घेतला. “पहिली १० षटकं व्यवस्थित खेळून काढणं हे आमच्यासमोरचं पहिलं लक्ष्य होतं. ते यशस्वीपणे पार केल्यानंतर पुढचा प्रवास सोपा होतो, आणि शिखर धवन सोबत असताना मला फारसं बोलावं लागत नाही.” रोहितने सामना संपल्यानंतर आपल्या द्विशतकी भागीदारीबद्दल प्रतिक्रीया दिली.

आतापर्यंत आम्ही दोघेही एकमेकांचा खेळ चांगलाच ओळखून आहोत, त्यामुळे फलंदाजीदरम्यान फारसं बोलावं लागत नाही. शिखरला जास्तीत जास्त वेळ फलंदाजी करता येईल याकडे माझा कल असतो. रोहितने शिखरच्या खेळाचं कौतुक केलं. रोहित आणि शिखरने पाकिस्तानविरुद्ध पहिल्या विकेटसाठी केलेली २१० धावांची भागीदारी ही आतापर्यंतची सर्वोत्तम भागीदारी ठरली आहे. या जोडीने सचिन-सौरवच्या नावावर असलेला विक्रम आपल्या नावे केला.

अवश्य वाचा – Asia Cup 2018 : भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात तब्बल १६ विक्रमांची नोंद, जाणून घ्या !

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत संघाचं नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्मानेही रविवारच्या सामन्यात शतक झळकावलं. रोहितने कालच्या सामन्यात वन-डे कारकिर्दीतला ७ हजार धावांचा टप्पा ओलांडला. आतापर्यंतच्या मालिकेत रोहित आणि शिखर धवन ही जोडी चांगल्याच फॉर्मात आहे. शिखर धवनने आतापर्यंत मालिकेत २ शतकं झळकावली आहेत. त्यामुळे यापुढील सामन्यांमध्ये ही जोडी कसा खेळ करते आणि भारताला पुन्हा एकदा विजेतेपद मिळवून देते का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – Ind vs Pak : DRS चा निर्णय घेताना धोनीची चतुराई, पाकिस्तानचा इमाम उल हक तंबूत