भारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली २०२० या वर्षाची सुरुवात मालिका विजयाने केली. श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने ७८ धावांनी बाजी मारली. या विजयासह भारताने ३ टी-२० सामन्यांची मालिका २-० ने जिंकली. नवीन वर्षातला भारतीय संघाचा हा पहिला मालिका विजय ठरला.

भारताचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी याने सामन्यात दमदार पराक्रम केला. त्याने २८ धावांमध्ये ३ गडी टिपले आणि भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. श्रीलंकेच्या फलंदाजीच्या वेळी कुशल परेरा खेळत होता. तो ७ धावांवर खेळत असताना नवदीप सैनीने त्याला एक वेगवान यॉर्कर टाकला. काहीही कळण्याआधी चेंडू थेट स्टंपवर आदळला आणि फलंदाज बाद झाला.

हा व्हिडीओ –

अशी रंगली ३ सामन्यांची मालिका

तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे वाया गेला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने ७ गडी राखून सहज विजय मिळवला. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २०१ धावा केल्या. विजयासाठी दिलेले २०२ धावांचे आव्हान श्रीलंकेला पेलवले नाही. श्रीलंकेचा संघ १२३ धावांपर्यंत मजल मारु शकला. पाहुण्या संघाकडून धनंजय डी-सिल्वाने ५७ तर अँजलो मॅथ्यूजने ३१ धावा करत थोडा प्रतिकार केला, पण अखेर त्यांची झुंज अपयशी ठरली.