शिखर धवनच्या धडाकेबाज शतकी खेळीमुळे भारताला तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात विजयाचे ‘शिखर’ सर करता आले आणि मालिकेवर २-१ असे वर्चस्व राखता आले. धवन, युवराज सिंग आणि सुरेश रैना या डावखुऱ्या फलंदाजांच्या ‘डाव्या आघाडी’ने बुधवारी भारताच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. धवनने चौफेर फटकेबाजी करीत २० चौकारांच्या साहाय्याने शतक साकारले आणि सामनावीर किताबावर नाव कोरले. त्यामुळेच भारताला २३ चेंडू आणि पाच विकेट राखून आरामात विजय
साजरा करता आला. विराट कोहली याला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
घरच्या मैदानावर आणखी एका एकदिवसीय चषकावर नाव कोरताना भारताने प्रथम वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना ५ बाद २६३ धावांवर सीमित ठेवले. त्यानंतर भारताची सुरुवात खराब झाली. भरवशाचा फलंदाज रोहित शर्मा (४) आणि सातत्यपूर्ण फलंदाजी करणारा विराट कोहली (१९) लवकर तंबूत परतल्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला. परंतु धवनने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांवर आक्रमणाचे हत्यार उगारत युवराज सिंगच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी १२९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचून संघाचा डाव सावरला. धवनने ९५ चेंडूंत ११९ धावांसह आपले पाचवे एकदिवसीय शतक साजरे केले, तर सूर गवसलेल्या युवीने ७४ चेंडूंत ५५ धावांची खेळी साकारली. तब्बल चार वर्षांच्या अंतराने ग्रीन पार्क स्टेडियमला आंतरराष्ट्रीय सामन्याचे यजमानपद मिळाले होते.
त्याआधी, भारताचा संघनायक महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून पाहुण्या विंडीजला प्रथम फलंदाजीची संधी दिली. किरान पॉवेल, मार्लन सॅम्युअल्स आणि डॅरेन ब्राव्हो या त्रिकुटाच्या अर्धशतकांच्या बळावर वेस्ट इंडिजला समाधानकारक धावसंख्या रचता आली. पॉवेलने (७०) मालिकेतील सलग दुसरी अर्धशतकी खेळी साकारली. त्याने सॅम्युअल्स (७१) सोबत दुसऱ्या विकेटसाठी ११७ धावांची भागीदारी रचून विंडीजच्या धावसंख्येचा पाया रचला. मग डॅरेन ब्राव्हो (नाबाद ५१) आणि डॅरेन सॅमी (नाबाद ३७) यांनी अखेरच्या षटकांमध्ये आक्रमण केल्यामुळे वेस्ट इंडिजला २६० धावांचा टप्पा ओलांडता आला. वेस्ट इंडिजने १ बाद १३७ अशी दमदार सुरुवात केली होती. त्या वेळी वेस्ट इंडिज मोठी धावसंख्या रचणार, अशी लक्षणे दिसत होती. परंतु भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना फार डोके वर काढू दिले नाही. भारताकडून ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने १० षटकांत ४५ धावांत २ बळी घेतले.

‘‘ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेच्या तुलनेत शेवटच्या षटकांतील आमची गोलंदाजी सुधारली आहे. यॉर्करची संख्या तुलनेने कमी आहे, परंतु यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नांत फुलटॉस चेंडू पडत आहेत. यॉर्करची वाढती संख्या हे सुधारणा होत असल्याचे लक्षण आहे. मधल्या षटकांमध्ये दोन फिरकीपटूंसह सुरेश रैनाची कामगिरी चांगली झाली. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी चांगली सलामी दिली. विराट सातत्याने धावा करतोय तसेच तळाच्या फलंदाजांनीही चांगले योगदान दिले.’’                 
-महेंद्रसिंग धोनी, भारताचा कर्णधार

‘‘गोलंदाजीतील सातत्यपूर्ण कामगिरीच्या अभावामुळेच आम्ही मालिका विजयाची संधी गमावली. मालिका विजय हुकल्यामुळे मी निराश झालो आहे. ग्रीन पार्कच्या खेळपट्टीवर सरासरी २३० ते २३५ धावाच होऊ शकतात. मात्र आम्ही २६० धावांपलीकडे पोहोचल्यानंतर आम्हाला हा सामना जिंकता आला असता. तथापि, आमच्या गोलंदाजांना अपेक्षेइतका प्रभाव दाखविता आला नाही. भारतीय फलंदाजांनी आमच्या गोलंदाजांवर प्रभुत्व गाजविले. या अनुभवाचा फायदा घेत आम्हाला आत्मपरीक्षण करावे लागणार आहे.’’
-ड्वेन ब्राव्हो, वेस्ट इंडिजचा कर्णधार

धावफलक
वेस्ट इंडिज : जॉन्सन चार्ल्स त्रिफळा गो. कुमार ११, किरान पॉवेल झे. धवन गो. अश्विन ७०, मार्लन सॅम्युअल्स त्रिफळा गो. अश्विन ७१, डॅरेन ब्राव्हो नाबाद ५१, लेंडल सिमॉन्स झे. धोनी गो. जडेजा १३, ड्वेन ब्राव्हो झे. अश्विन गो. शामी ४, डॅरेन सॅमी नाबाद ३७, अवांतर (लेगबाइज २, वाइड ३, नो-बॉल १) ६, एकूण ५० षटकांत ५ बाद २६३.
बाद क्रम : १-२०, २-१३७, ३-१६८, ४-१८७, ५-१९६.
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ८-०-४२-१, मोहित शर्मा ७-०-४७-०, मोहम्मद शामी १०-१-४९-१, आर. अश्विन १०-०-४५-२, सुरेश रैना ५-०-२९-०, रवींद्र जडेजा १०-०-४९-१.
भारत : रोहित शर्मा झे. ड्वेन ब्राव्हो गो. रामपॉल ४, शिखर धवन झे. आणि गो. ड्वेन ब्राव्हो ११९, विराट कोहली झे. चार्ल्स गो. रामपॉल १९, युवराज सिंग झे. ड्वेन ब्राव्हो गो. नरिन ५५, सुरेश रैना झे. चार्ल्स गो. ड्वेन ब्राव्हो ३४, महेंद्रसिंग धोनी नाबाद २३, रवींद्र जडेजा नाबाद २, अवांतर (लेगबाइज ५, वाइड ४, नोबॉल १) १०, एकूण ४६.१ षटकांत ५ बाद २६६.
बाद क्रम : १-२९, २-६१, ३-१९०, ४-२१८, ५-२५५.
गोलंदाजी : रवी रामपॉल १०-१-५५-२, जेसॉन होल्डर ६-०-४७-०, ड्वेन ब्राव्हो १०-०-५७-२, सुनील नरिन १०-१-३२-१, डॅरेन सॅमी ३-०-२२-०, लेंडल सिमॉन्स ३-०-१७-०, वीरासॅमी परमॉल ४.१-०-३१-०.
सामनावीर : शिखर धवन.
मालिकावीर : विराट कोहली.