पुढील वर्षी ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर येणार असून, त्यावेळी उभय संघांमध्ये दिवस-रात्र कसोटी सामना खेळवण्यात यावा, असा प्रस्ताव भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) ठेवण्यात आला असल्याची माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी जेम्स सदरलँड यांनी दिली.
न्यूझीलंडचा संघ ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारत दौऱ्यावर येत असून यावेळी भारतीय संघ आपला पहिलावहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार आहे, असे बीसीसीआयने आधीच जाहीर केले होते. त्यानंतर आता ही नवी योजना समोर येत आहे.
‘‘दिवस-रात्र कसोटी सामन्यांसर्दभात काही सकारात्मक संकेत आता मिळू लागले आहेत. पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात येणार आहे. यावेळी दिवस-रात्र कसोटी सामना व्हावा, यासाठी चर्चा सुरू झाली आहे,’’ असे सदरलँड यांनी सांगितले.
मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्या पहिला प्रकाशझोतातील कसोटी सामना झाल्यापासून क्रिकेटमध्ये नव्या पर्वाला प्रारंभ झाला आहे. मात्र दिवस-रात्र कसोटीसाठी वापरण्यात येणाऱ्या गुलाबी चेंडूबाबत क्रिकेटविश्वात चिंता प्रकट करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात जाणार असून, त्यावेळी दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्याची इच्छा ए बी डी’व्हिलियर्सने प्रकट केली आहे.
‘‘दिवस-रात्र कसोटी सामना अतिशय प्रेक्षणीय असाच होता. मात्र बऱ्याच विभागांमध्ये सुधारणेला वाव आहे,’’ असे मत काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार स्टीव्ह वॉ यांनी व्यक्त केले होते.

२७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर, २०१५ या कालावधीत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळवण्यात आला होता. अ‍ॅडलेड ओव्हल येथे झालेल्या या लढतीत ऑस्ट्रेलियाने तीन विकेट्स राखून विजय मिळवला आणि तीन सामन्यांची कसोटी मालिका २-० अशी जिंकली होती.