सुलतान अझलन शाह चषक हॉकी स्पध्रेत आत्तापर्यंत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाची मंगळवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत खरी कसोटी ठरणार आहे. न्यूझीलंडवर दणदणीत विजय साजरा केल्यानंतर गतविजेत्या ऑस्ट्रेलियालाही कडवी झुंज देण्याचा निर्धार भारतीय खेळाडूंनी केला आहे.

स्पध्रेच्या पहिल्या लढतीत २-० अशा आघाडीनंतरही बचावफळीतील शिथिलतेमुळे भारतीय संघाला इंग्लंडने २-२ असे रोखण्यात यश मिळवले, परंतु चुकांमधून धडा घेत भारताने दुसऱ्या लढतीत न्यूझीलंडला ३-० असे नमवण्याची किमया केली. न्यूझीलंडने पहिल्या लढतीत विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला १-१ असे बरोबरीत रोखले होते. त्यामुळे भारताचे मनोबल उंचावले आहे. तरीही ऑस्ट्रेलियाला कमी लेखणे भारताला चालणारे नाही. युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या या संघाने यजमान मलेशियाचा ६-१ असा धुव्वा उडविला आहे.

‘‘आम्हाला खेळात सातत्याने सुधारणा करायची आहे. इपोह येथे या उद्देशाने आम्ही दाखल झालो आहोत, परंतु त्याचबरोबर आम्हाला चांगले निकालही हवे आहेत,’’ असे मत भारतीय संघाचे प्रशिक्षक रोलँट ओल्टमन्स यांनी व्यक्त केले. त्यांनी आपल्या आक्रमणपटूंच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले. विशेषत: कठीण प्रसंगी त्यांनी निर्माण केलेल्या संधींची ओल्टमन्स यांनी प्रशंसा केली.

ओल्टमन्स म्हणाले की, ‘‘आघाडीपटू आणि मध्यरक्षक यांच्यातील समन्वय ही माझ्यासाठी मुख्य बाब आहे. तो राखण्यात आम्ही यश मिळवले आहे. पहिल्या सामन्याच्या तुलनेत आघाडीपटूंनी न्यूझीलंडविरुद्ध वेगळी खेळी केली. पुढील सामन्यांत त्यात अजून सुधारणा करण्याचा प्रयत्न असेल.’’

बचावपटूंच्या कामगिरीवर मात्र प्रशिक्षक काहीसे नाराज आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सत्रात बचावपटूंनी चांगला खेळ केला नाही. त्यांनी प्रतिस्पर्धी संघांच्या आक्रमणपटूंना वर्तुळावर चाल करण्याच्या संधी दिल्या.