भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानचे मत
भारतातील खेळपट्टय़ा फिरकीला पोषक आहेत. भारताकडे चांगले फिरकीपटू आहेत, त्याचबरोबर त्यांना समर्थपणे फिरकीचा सामनाही करता येतो. त्यामुळे ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारतालाच पसंती असेल, असे मत भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने व्यक्त केले.
‘‘ सध्याच्या घडीला क्रिकेटमध्ये बरेच बदल झाले आहेत. नवीन फटके फलंदाजांकडून पाहायला मिळतात. त्याचबरोबर गोलंदाजही वैविध्यपूर्ण गोलंदाजी करताना दिसतात. त्यामुळे हा विश्वचषक चाहत्यांसाठी खास मेजवानी असेल,’’ असे झहीर म्हणाला.
तो पुढे म्हणाला की, ‘‘विश्वचषक खेळणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. सर्वोत्तम कामगिरी करून विश्वचषकाला गवसणी घालण्याचे ध्येय प्रत्येक खेळाडू उराशी बाळगत असतो. मीदेखील हेच स्वप्न पाहिले होते आणि २०११ साली ते वानखेडे स्टेडियमवर सत्यात उतरले. हा क्षण अभिमानास्पद होता.’’