लखनौ : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात दारुण पराभव पत्करल्यानंतर मंगळवारी होणाऱ्या दुसऱ्या लढतीत कामगिरी उंचावून मालिकेत बरोबरी साधण्याचे आव्हान भारतीय महिला संघापुढे आहे.

गतवर्षी मार्चमध्ये झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर भारतीय संघ प्रथमच आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. परंतु तिन्ही आघाडय़ांवर सुमार खेळ केल्यामुळे आफ्रिकेने भारताला आठ गडी राखून नमवले. सर्व सामने लखनौच्या एकाच स्टेडियमवर होणार असल्याने आता दुसऱ्या सामन्यात भारतीय खेळाडू अधिक जोमाने खेळतील, अशी अपेक्षा आहे.

कर्णधार मिताली राज, उपकर्णधार हरमनप्रीत कौर यांनी पहिल्या लढतीत अनुक्रमे ५० आणि ४० धावांचे योगदान देत सूर गवसल्याचे संकेत दिले. अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीनेसुद्धा भारतासाठी दोन बळी मिळवले. परंतु संघातील युवांनी जबाबदारीने खेळ करणे गरजेचे आहे. आफ्रिकेचा संघ मात्र कामगिरीत सातत्य राखून पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

’ सामन्याची वेळ : सकाळी ९ वा.

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २

महिलांच्या ‘आयसीसी’ स्पर्धामध्ये संघसंख्येत वाढ

दुबई : महिलांच्या विश्वचषक स्पर्धामध्ये २०२६ पासून संघांची वाढ करण्यात येणार असल्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सोमवारी जाहीर केले. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिला क्रिकेटचा अधिक प्रसार करण्याच्या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे, असे ‘आयसीसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनू सावनी यांनी सांगितले. त्यामुळे २०२६ मध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात १० ऐवजी १२ संघ खेळतील. त्याचप्रमाणे २०२९च्या एकदिवसीय विश्वचषकात आठऐवजी १० संघांचा समावेश करण्यात येणार आहे. २०२७ मध्ये प्रथमच महिलांची ट्वेन्टी-२० चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहा संघांना सहभागी होता येईल.