लंडनमध्ये झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारतीय तिरंदाजांची कामगिरी निराशाजनक झाली असली, तरी २०१६च्या ब्राझील ऑलिम्पिकमध्ये भारतीय तिरंदाजांना निश्चित पदक मिळेल, असा विश्वास भारतीय महिला तिरंदाजी संघाच्या प्रशिक्षक पूर्णिमा महातो यांनी व्यक्त केला. महातो यांनी आजपर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत कौतुकास्पद कामगिरी केली आहे. तसेच त्यांनी दीपिका कुमारी हिच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंना मार्गदर्शन केले आहे. केंद्र शासनाने नुकताच त्यांना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित केले आहे. तिरंदाजीविषयी व भारतीय खेळाडूंच्या कामगिरीविषयी त्यांनी खास बातचीत केली.
द्रोणाचार्य पुरस्काराबद्दल तुम्ही समाधानी आहात काय?
हो अर्थातच. हा पुरस्कार माझा नसून तिरंदाजीचा गौरव आहे. चेक्रोवोलू स्वुरो हिला अर्जुन पुरस्कार व मला द्रोणाचार्य पुरस्कार मिळाल्यामुळे आम्हा तिरंदाजांसाठी ही अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे. या पुरस्कारांमुळे या खेळाची लोकप्रियता वाढण्यास मदत होईल.
लंडन येथे दीपिका कुमारी हिची कामगिरी निराशाजनक झाली, त्याबाबत काय सांगता येईल?
जागतिक स्पर्धापेक्षा ऑलिम्पिक स्पर्धा ही खूप मुलखावेगळी असते. तेथे सहभागी झाल्यानंतर आपोआपच प्रत्येक खेळाडूवर मानसिक दडपण येते. दीपिका ही त्यास अपवाद नाही. त्यामुळेच अपेक्षेइतकी कामगिरी करता आली नाही. प्रत्येक बाणाची कामगिरी अचूक होण्याची आवश्यकता असते. दुर्दैवाने दीपिका व भारताच्या अन्य खेळाडूंना अचूकता साधता आली नाही. अर्थात या स्पर्धेतील अनुभवाची शिदोरी त्यांना भावी कारकीर्दीसाठी उपयुक्त ठरणार आहे.
ब्राझील ऑलिम्पिकमध्ये भारताला पदकाच्या कितपत संधी आहेत?
आतापासून याचा अंदाज बांधणे कठीण असले, तरी भारतीय खेळाडूंची सध्याची कामगिरी पाहता त्याच दिशेने त्यांची वाटचाल चालली आहे. या स्पर्धेस भरपूर अवधी असल्यामुळे सराव शिबिरे व स्पर्धात्मक सराव आदींबाबत योग्य नियोजन केल्यास ऑलिम्पिक पदक मिळविणे शक्य आहे. भारतीय खेळाडूंसाठी लीम चोई या कोरियन प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचा फायदा भारतीय खेळाडूंना मिळणार आहे.
भारतीय खेळाडूंच्या मानसिक तंदुरुस्तीबाबत काय उपाययोजना केली आहे?
भारतीय खेळाडूंची मानसिक दडपणामुळे ऑलिम्पिकमध्ये अपेक्षेइतकी कामगिरी होत नाही, हे लक्षात घेऊन सराव शिबिरात ध्यानधारणा व योगासन यावरही भर दिला जात आहे. खेळाडूंची एकाग्रता कशी वाढेल यासाठीही भर दिला जात आहे. त्याखेरीज क्रीडा मानसतज्ज्ञांचीही मदत घेतली जात आहे. त्याखेरीज पूरक व्यायामवरही भर दिला जात आहे. दडपणाखाली खेळाडूंकडून नकळत चूक होते व हे टाळण्यासाठी काही परदेशी स्पर्धकांच्या व्हिडिओ कॅसेट्सचा उपयोग केला जात आहे.
सध्याच्या खेळाडूंना मिळणाऱ्या सुविधा पुरेशा आहेत काय?
होय, आम्ही ज्या वेळी आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भाग घेत होतो, त्या वेळी जागतिक दर्जाच्या सुविधांचा अभाव होता. आता या खेळाकडे सकारात्मक वृत्तीने पाहिले जात आहे. शासनाकडूनही भरघोस मदत मिळत आहे. त्यामुळे खेळाडूंवरील आर्थिक समस्यांचे दडपण दूर होण्यास मदत झाली आहे. या खेळाची लोकप्रियता वाढू लागली आहे आणि अनेक नवनवीन शालेय मुले-मुली या खेळात कारकीर्द करू लागले आहेत. हा पारंपरिक क्रीडा प्रकार असल्यामुळे त्याचा ग्रामीण भागात अधिकाधिक प्रसार व प्रचार करण्याची आवश्यकता आहे.
आगामी जागतिक स्पर्धेत दीपिकापुढे कोणत्या खेळाडूंचे आव्हान असेल?
पॅरिस येथे सप्टेंबरमध्ये होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत दीपिकाला पदक मिळविण्याची हुकमी संधी आहे. तिच्यापुढे प्रामुख्याने चीन, दक्षिण कोरिया आदी आशियाई देशांचेच आव्हान असणार आहे.
जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्यानंतर भारतीय खेळाडूंचे थंड स्वागत झाले. त्याबाबत तुमचे काय मत आहे?
क्रिकेटचा अपवाद वगळता अन्य खेळांमधील जागतिक स्पर्धाना आपल्याकडे महत्त्व दिले जात नाही. खरे तर या खेळाडूंचे भव्य स्वागत झाले असते तर निश्चितच त्यांना भावी कारकीर्दीसाठी प्रोत्साहन मिळाले असते. प्रसारमाध्यमांनी आमच्या खेळाला मोठे केले आहे आणि अजूनही चांगली प्रसिद्धी मिळाली, तर पुढच्या जागतिक स्पर्धेच्या वेळी पदक विजेत्यांचे भव्य स्वागत होईल अशी मला खात्री आहे.