क्रिकेटवेड्या भारतात अनेक चाहते आपल्या आवडत्या क्रिकेटपटूला चिअर करण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. सचिन तेंडुलकरचा सर्वात मोठा चाहता म्हणून ओळखला जाणारा सुधीर गौतम याचं उत्तम उदाहरण आहे. चाहत्यांची ही यादी मोठी असून यामधील एक नाव आहे मुगुनथन. मुगुनथन भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याचा खूप मोठा चाहता आहे.

मुगुनथन हा मूळचा कोईम्बतूरचा असून त्याने आपल्या शरिरावर १६ वेगवेगळ्या भाषांमध्ये हार्दिक पांड्याचं नाव गोंदवलं आहे. जेव्हा वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे हार्दिक पांड्या अडचणीत आला होता तेव्हा मुगुनथन याने मुंडन करत पुन्हा एकदा त्याने भारतीय संघात पुनरागमन करावं यासाठी प्रार्थना केली होती. हार्दिक पांड्या स्टाइल आयकॉन म्हणूनही ओळखला जातो. तो नेहमी आपल्या लूकमध्ये बदल करत असतो. यामुळे मुगुनथन हादेखील हार्दिक पांड्याप्रमाणेच हेअरस्टाइल ठेवतो.

हार्दिक पांड्याला खेळताना पाहण्यासाठी मुगुनथन अनेकदा अनेक किमीचा प्रवास करतो. अनेकदा त्याने हार्दिक पांड्याची भेटदेखील घेतली आहे. हार्दिक पांड्यानेही आपल्या या चाहत्याला सेल्फी, फोटो, ऑटोग्राफ देत त्याची इच्छा पूर्ण केली आहे. पण काही दिवसांपूर्वी धरमशाला येथे भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरोधातील पहिला टी-२० सामना पाहण्यासाठी जात असताना मुगुनथन याचा मोठा अपघात झाला.

मुगुनथन आपल्या मित्रासोबत ३००० किमीचा प्रवास रस्त्याने करण्यासाठी निघाला होता. कोईम्बतूर ते धरमशाला हा प्रवास करत असताना २००० किमी अंतर पार केल्यानंतर जबलपूर येथे त्याचा मोठा अपघात झाला. त्याला उपचारासाठी सुरुवातीला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नंतर जबलपूर येथील मेट्रो रुग्णालयात नेण्यात आलं. त्याला काही गंभीर जखमा झाल्या होत्या. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करणं गरजेचं असल्याचं सांगितलं होतं.

हार्दिक पांड्याला जेव्हा याबद्दल कळलं तेव्हा त्याला याबद्दल खूप वाईट वाटलं. सोबतच मुगुनथन याने इतक्या लांबचा प्रवास ट्रेनने का केला नाही याबद्दल नाराजीही व्यक्त केली. हार्दिक पांड्याने आपल्या या चाहत्याला मदत करायचं ठरवलं आणि त्याच्या उपचाराचा सर्व खर्च करण्याचा निर्णय घेतला. उपचारानंतर २१ सप्टेंबरला मुगुनथन पुन्हा त्याच्या घरी कोईम्बतूरला परतला. हार्दिक पांड्याने केलेल्या मदतीमुळे मुगुनथन पुन्हा एकदा आपल्या लाडक्या क्रिकेटपूला चिअर करण्यासाठी पूर्णपणे तंदरुस्त झाला आहे.