चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा पराभव करत भारताने अखेर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपची अंतिम फेरी गाठली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपचं तिकीट मिळवण्यासाठी भारताला इंग्लडंचा पराभव करणं किंवा सामना अनिर्णित राखणं गरजेचं होतं. अन्यथा भारताच्या जागी ऑस्ट्रेलियाला संधी मिळाली असती.

तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा १० गडी राखून पराभव केल्यानंतर भारतीय संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला होता. भारताने ७१.० टक्के गुणांसह पहिल्या क्रमांकावर झेप घेतली होती तर या ऑस्ट्रेलिया तिसर्‍या स्थानावर होता. मात्र तरीही भारताला अंतिम तिकीट मिळालेलं नव्हतं.

Ind vs Eng: अश्विन आणि अक्षर पटेलकडून इंग्लंडची ‘फिरकी’; एक डाव राखत दारुण पराभव

दरम्यान ७० टक्के गुणांसह दुसर्‍या स्थानावर असणाऱ्या न्यूझीलंडने आधीच अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळे न्यूझीलंडविरोधात ऑस्ट्रेलिया खेळणार की भारत याचा निर्णय या सामन्यावर अवलंबून होता.

अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला कोणत्याही परिस्थितीत इंग्लंडविरोधातील चौथा कसोटी सामना जिंकणं किंवा अनिर्णित राखण्याची गरज होती. जर भारताने सामना गमावला असता आणि मालिका २-२ ने बरोबरीत सुटली असती तर ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरली असती. पण भारताने इंग्लंडचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला असून वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपची अंतिम फेरी गाठली आहे.

२५ धावा आणि एक डाव राखून चौथा सामना जिंकला
चौथ्या कसोटीतही भारताने इंग्लंडचा दारुण पराभव केला. भारताने एक डाव राखून आणि २५ धावांनी इंग्लंडचा पराभव केला. भारताने पहिल्या डाव्यात १६० धावांची आघाडी घेतल्यानंतर मैदानात उतरलेल्या इंग्लंड संघाचे फलंदाज आर अश्विन आणि अक्षर पटेलच्या फिरकीच्या जाळ्यात अडकले. दोघांनीही प्रत्येकी पाच विकेट घेत भारताच्या नावावर अजून एका ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. या सामन्यासोबतच भारताने चार सामन्यांची ही कसोटी मालिका ३-१ ने जिंकली.