‘सिर्फ नाम ही काफी है….’ हा डायलॉग चित्रपटांमध्ये जितक्या प्रभावीपणे वापरण्यात आला तितकाच तो अनेकांच्या खऱ्या आयुष्यातही लागू झाला. अशाच काही व्यक्तींमधील एक नाव म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर. क्रिकेटचा देव, मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिनविषयी प्रत्येकालाच आपुलकी वाटते. अशा या विक्रमादिच्याचा आज वाढदिवस. सचिनच्या आयुष्यावर आजवर बऱ्याच गोष्टी लिहिल्या गेल्या, कलाविश्वातही त्याच्या किरकिर्दीची दखल घेतली गेली. अशा या खेळाडूच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या आयुष्यातील काही खास गोष्टींवर आपण आज नजर टाकणार आहोत.

*सचिनचे वडील, रमेश तेंडुलकर हे गायक सचिन देव बर्मन यांचे चाहते होते. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलाचं नावही सचिन ठेवलं.

*भारत- पाकिस्तान या दोन्ही देशांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या १९८७च्या विश्वचषकामध्ये सचिन बॉल बॉय होता.


*त्यानंतर जवळपास दोन वर्षांनी म्हणजेच १८ डिसेंबर, १९८९ मध्ये त्याने क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

*पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये सचिन एकही धाव करु शकला नाही.

*१९८८ मध्ये खेळल्या गेलेल्या आंतरशालेय क्रिकेट स्पर्धांमध्ये सचिन रमेश तेंडुलकरने विनोद कांबळीसोबतच्या ६६४ धावांच्या भागीदारीत ३२६ धावा केल्या होत्या.

*ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज डेनिस लिली यांनी १९८७ मध्ये एमआरएफ पेस अकॅडमीमध्ये सचिनला प्रवेश नाकारला होता.

*२०१० या वर्षात सचिनने कारकिर्दीत आणखी एका विक्रमाला गवसणी घातली. याच वर्षी एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये द्विशतक ठोकणारा सचिन हा पहिला फलंदाज ठरला.

वाचा : मित्राच्या ‘त्या’ एका वाक्यामुळे सचिन मुंबईच्या रस्त्यावर खेळला क्रिकेट

*क्रिकेट कारकिर्दीत सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रमही सचिनच्याच नावे आहे.
अशा या क्रिकेटच्या देवाविषयी जितकं बोलावं, लिहावं तितकं कमीच आहे. त्यामुळे मास्टर ब्लास्टर सचिनला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्हीही कमेंट बॉक्समध्ये लाडक्या सचिनला शुभेच्छा देऊ शकता.