महिला आणि पुरुष संघांचा दक्षिण कोरियाकडून निसटता पराभव

अत्यंत निकराची झुंज देऊनदेखील भारतीय पुरुष आणि महिलांना दक्षिण कोरियाकडून निसटता पराभव सहन करावा लागल्याने दोघांना रौप्यवर समाधान मानावे लागले.

पुरुषांचा सामना गुणबरोबरीत संपल्याने घेतलेल्या शूटऑफमध्येदेखील दोन्ही संघांनी २९ गुण नोंदवत बरोबरी साधली. पुन्हा बरोबरी झाल्याने अखेरीस संपूर्ण सामन्यात सर्वाधिक वेळा १० गुण मिळवलेल्या दक्षिण कोरियास विजयी घोषित करण्यात आल्याने भारतासाठी पुरुषांचा पराभव खूपच जिव्हारी लागणारा ठरला. त्यामुळे तिरंदाजीत दोन रौप्यपदके मिळाली तरी दोन सुवर्ण हुकल्याची खंत अधिक आहे.

अभिषेक वर्मा, रजत चौहान आणि अमन सैनी या भारतीय पुरुषांनी परिपूर्ण ६० गुणांची कमाई केली, तर कोरियाला ५६ गुणच मिळवता आले. दुसऱ्या सेटमध्ये भारताने ५४ तर कोरियाने ५८ गुण मिळवल्याने दोन्ही संघांची ११४-११४ अशी गुणबरोबरी झाली. त्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये भारताने ५८, तर कोरियाने ५६ गुणांची कमाई केल्याने भारताला दोन गुणांची आघाडी मिळाली. मात्र चौथ्या सेटमध्ये ती दोन गुणांची आघाडी कमी करत कोरियाने २२९-२२९ अशी गुणबरोबरी साधली. त्यामुळे अखेरीस सामना शूटऑफमध्ये नेण्यात आला. दोन्ही संघाच्या तिन्ही नेमबाजांना प्रत्येकी एका शॉटची संधी देऊन त्यात जो संघ जास्त गुण मिळवेल तो विजेता ठरवला जातो. मात्र, त्यातदेखील दोन्ही संघांनी अफलातून खेळाचे सादरीकरण केले. भारतीय नेमबाजांनी ९, १०, १० असे २९ गुण मिळवले, तर कोरियाच्या नेमबाजांनी १०, ९, १० असे २९ गुण मिळवले. शूटऑफमध्येदेखील बरोबरी झाल्याने सामन्यात कोणत्या संघाने १० गुण अधिक वेळा मिळवले, ते मोजले असता त्यात कोरियाची सरशी झाल्याने भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

महिलांची तुल्यबळ लढत

त्याआधी सकाळी महिला कम्पाऊंड गटातील भारताच्या तिरंदाज मुस्कार किरार, मधुमिता कुमारी आणि सुरेखा वेन्नाम यांनी दक्षिण कोरियाच्या महिला संघाला तुल्यबळ लढत दिली. पहिल्या सेटमध्ये ५९-५७ अशी दोन गुणांची आघाडी घेतली, तर कोरियाने दुसऱ्या सेटमध्ये ५८-५६ अशी आघाडी घेतल्याने सामना ११५-११५ असा बरोबरीत गेला. त्यानंतर दोन्ही संघांनी ५८ गुणांची कमाई केल्याने तिसऱ्या सेटमध्ये हा सामना १७३-१७३ असा गुणबरोबरीत कायम राहिला. मात्र अखेरच्या चौथ्या सेटमध्ये कोरियाने ५८ गुण, तर भारतीय संघाने ५५ गुणांची कमाई केल्याने भारताला २३१-२२८ अशा तीन गुणांच्या फरकाने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

अशा प्रकारच्या अटीतटीच्या अंतिम लढतीत तुम्ही काहीच सांगू शकत नाही. वाऱ्यानेदेखील आम्हाला दगा दिला. त्यामुळे हा दिवस आमच्यासाठी दुर्दैवी होता, इतकेच मी सांगू शकतो.    – अभिषेक वर्मा, तिरंदाज

आम्ही गत आशियाई स्पर्धेत कांस्यपदक मिळवले होते. त्या कामगिरीत आम्ही आता सुधारणा केली असून यंदा रौप्यपदक मिळवले आहे.      – सुरेखा वेन्नाम, महिला तिरंदाज