पाकिस्तानविरुद्धच्या लढतीबाबत भारतीय टेनिस संघटनेला विनंती

नवी दिल्ली : पाकिस्तानविरुद्धची डेव्हिस चषक टेनिस लढत इस्लामाबादहून त्रयस्थ ठिकाणी हलवण्यात यावी, अशी विनंती भारतीय संघातील खेळाडूंनी केली आहे. परंतु भारतीय टेनिस संघटना मात्र सुरक्षा व्यवस्थेची हमी मागत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

त्रयस्थ ठिकाणी पाकिस्तानशी डेव्हिस चषक सामना खेळवण्यात यावा, अशी वारंवार मागणी भारतीय टेनिस संघटनेकडून केली जात असल्याचे चर्चेत आहे. परंतु संघटनेचे सरचिटणीस हिरोन्मय चॅटर्जी यांनी फक्त कडेकोट सुरक्षेची हमी आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाकडे मागितल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे खेळाडू आणि संघ व्यवस्थापन निराश झाल्याने त्यांनी संघटनेशी संपर्क साधला आहे.

‘‘आम्ही भारतीय टेनिस संघटनेकडे त्रयस्थ ठिकाणी सामन्याची विनंती केली आहे,’’ असे भारताचा कर्णधार महेश भूपतीने सांगितले. संघटना हे प्रकरण ज्या पद्धतीने हाताळते आहे, ते पाहून आश्चर्य वाटले, असे अन्य खेळाडूने म्हटले आहे.

सुरक्षा व्यवस्थेसंदर्भातील ताज्या आढाव्यानंतर आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने हिरवा कंदील दिल्यास १४ आणि १५ सप्टेंबरला होणाऱ्या या सामन्यासाठी व्हिसा प्रक्रिया करावी लागणार आहे, असे भारतीय टेनिस संघटनेने सांगितले.

‘‘जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे भारत-पाकिस्तान यांच्यातील राजनैतिक संबंध पुन्हा बिघडले आहेत. या पाश्र्वभूमीवर भारत सरकारने डेव्हिस चषक लढतीबाबत ठोस भूमिका घेण्याची आवश्यकता आहे,’’ असे टेनिस संघटनेतील एका गटाचे म्हणणे आहे.

‘‘आशियाई-ओशियाना गट-१ची ही लढत द्विराष्ट्रीय मालिका नाही. डेव्हिस चषक लढतीचे आयोजन जागतिक संघटना करीत असते. त्यामुळे पाकिस्तानमधील स्पर्धेतून माघार घेणे योग्य ठरणार नाही,’’ असे क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले.

‘‘ऑलिम्पिक क्रीडा प्रकारांना सरकारचा हस्तक्षेप मान्य नसतो. परंतु टेनिसपटू हे भारताचे नागरिक नाहीत का? या खेळाडूंना न थांबवून सरकार त्यांच्या जिवाची जोखीम का पत्करत आहे?’’ असे प्रश्न एका पदाधिकाऱ्याने विचारले आहेत.

हे आपल्याला माहीत आहे का?

* १९६४नंतर भारतीय संघाने डेव्हिस चषकासाठी पाकिस्तान दौरा केलेला नाही.

* २०१६मध्ये पाकिस्तानचा संघ त्रयस्थ ठिकाणी खेळला होता. त्या वेळी चीनच्या सामन्यांचे कोलंबोत आयोजन करण्यात आले होते.

* २०१७पासून पाकिस्तानचा संघ पाचपैकी चार मायदेशातील डेव्हिस सामने खेळला आहे. कोरिया, थायलंड, उझबेकिस्तान व इराण हे संघ इस्लामाबादमध्ये सामने खेळले. परंतु हाँगकाँगने खेळण्यास नकार दिल्यामुळे पाकिस्तानला पुढे चाल देण्यात आली.