नवी दिल्ली : करोनाच्या भीतीमुळे एच. एस. प्रणॉय, चिराग शेट्टी-सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी तसेच अनेक अव्वल बॅडमिंटनपटूंनी पुढील आठवडय़ापासून रंगणाऱ्या प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतली आहे.

११ मार्चपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेद्वारे खेळाडूंना टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरण्याची संधी मिळणार आहे. प्रणॉय, चिराग, सात्त्विक यांच्यासह मनू अत्री आणि बी. सुमित रेड्डी यांनी माघार घेतली असली तरी सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, किदम्बी श्रीकांत, अश्विनी पोनप्पा, एन. सिक्की रेड्डी आणि प्रणव जेरी चोप्रा हे खेळाडू सहभागी होणार आहेत.

‘‘काही खेळाडूंनी माघारीचे पत्र भारतीय बॅडमिंटन महासंघाकडे (बीएआय) पाठवले आहे. मात्र भारताचे काही अव्वल खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. आम्ही त्याबाबतची कल्पना संयोजकांना दिली आहे. दुबईमार्गे इंग्लंडला रवाना होण्यास खेळाडूंचा नकार आहे,’’ असे बीएआयचे सचिव अजय सिंघानिया यांनी सांगितले.

भारतीय तिरंदाजी संघाची आशिया चषकातून माघार

कोलकाता : भारतीय तिरंदाजी महासंघाने (एएआय) करोनाच्या धास्तीमुळे बँकॉक येथे रंगणाऱ्या आशिया चषक या जागतिक क्रमवारी स्पर्धेतून आपला संघ माघारी घेतला आहे. थायलंडमध्ये ८ ते १५ मार्चदरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. पाच महिन्यांच्या बंदीनंतर ही भारताची पहिली स्पर्धा होती. ‘‘करोनाच्या पार्श्वभूमीवर सद्यपरिस्थितीचा आढावा घेऊन भारतीय क्रीडा प्राधिकरण तसेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती खेळाडूंच्या प्रवासाबाबत साशंक आहे. त्यामुळेच खेळाडूंच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य देऊन या स्पर्धेतून माघार घेण्याचे ठरवले आहे,’’ असे एएआयचे महासचिव गुंजन अबरोल यांनी पत्राद्वारे जागतिक तिरंदाजी महासंघाला कळवले आहे.

‘आयपीएल’ला करोनाचा फटका?

नवी दिल्ली : करोना विषाणू संसर्गामुळे जगभरातील अनेक महत्त्वाच्या स्पर्धा रद्द कराव्या लागल्यानंतर आता इंडियन प्रीमियर क्रिकेट लीगला (आयपीएल) त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. भारतातील करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. मात्र पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच ही स्पर्धा घेण्याचे संयोजकांचा मानस आहे. आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या एकाही परदेशी खेळाडूने भारतात प्रवास करण्याविषयी आक्षेप घेतलेला नाही. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजमधील जवळपास ६० खेळाडू आयपीएलमध्ये खेळणार आहेत.