करोना विषाणूचा सामना करण्यासाठी देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं. या परिस्थितीचा फटका क्रीडा जगतालाही बसला. टोकियो ऑलिम्पिकसह सर्व महत्वाच्या स्पर्धा या काळात पुढे ढकलण्यात आल्या. परंतू आर्थिक चक्र गाळात रुतल्यामुळे भारतीय खेळाडूंवर सध्याच्या काळात आर्थिक संकट आलं आहे. भारताची धावपटू द्युती चंदला आपल्या ऑलिम्पिक तयारीसाठी स्पॉन्सरशीप मिळत नसल्यामुळे आपली BMW गाडी विकण्याची वेळ आलेली आहे.

“सध्याच्या काळात करोनामुळे सर्व स्पर्धा रद्द केल्या जात आहेत. ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलली गेल्यामुळे स्पॉन्सरशीपही नाहीये. माझ्याजवळ जेवढे पैसे होते तेवढे आतापर्यंत सरावावर खर्च झाले आहेत आणि आता माझ्याकडे गेल्या काही महिन्यांपासून उत्पन्नाचं नवीन साधन नाहीये. स्पॉन्सरशीप मिळण्याची शक्यता कमी असल्यामुळे माझ्याकडे गाडी विकणं हा एकमेव पर्याय आहे.” द्युती टाइम्स नाऊशी बोलत होती. २०१८ साली तेलंगणा सरकारकडून मिळालेल्या ३० लाखांच्या बक्षीसातून द्युतीने ही गाडी खरेदी केली होती. द्युती अ‍ॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या नियमांनुसार सराव करत नसल्यामुळे तिला सरकारी मदत मिळत नाही.

राज्य सरकार आणि खासगी स्पॉन्सरशीपच्या माध्यमातून द्युतीचा सराव सुरु होता. परंतू ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलली गेल्यामुळे आतापर्यंत मिळालेला सर्व पैसा द्युतीने सरावात खर्च केला. सध्या द्युतीकडे Puma या कंपनीची एकमेव स्पॉन्सरशीप असून यावर्षी डिसेंबर महिन्यात ती संपणार आहे. २०१८ साली आशियाई खेळांमध्ये रौप्य पदकाची कमाई करणाऱ्या द्युती चंदला तेलंगणा सरकारने ३० लाखांची आर्थिक मदत केली होती. पण गाडी विकावी लागणार असल्याचं द्युतीला दुःख नाहीये. स्पर्धा जिंकल्यामुळे मी ही गाडी खरेदी करु शकले. परिस्थिती रुळावर आली की परत मैदानात उतरेल, स्पर्धा जिंकून पुन्हा नवीन गाडी घेईल असा आत्मविश्वास द्युतीने व्यक्त केला.