भारत हा क्रिकेटवेडा देश आहे आणि त्यामुळे येथे इतर खेळातील प्रयोग फार काळ यशस्वी ठरू शकत नाही, याची प्रचीती पुन्हा एकदा आली. गतवर्षी मोठय़ा थाटात जन्माला आलेल्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल लीगने पहिल्या हंगामात अनेक विक्रम मोडले. अगदी फिफा फुटबॉल विश्वचषक स्पध्रेला न मिळालेली प्रेक्षकसंख्या या लीगने ओलांडली, असा दावा आयोजकांकडून झाला. आपली पाठ थोपटून घेण्यासाठी त्यांच्याकडून वारंवार झालेले प्रयत्न किळसवाणे होते. त्यात चुकीचे काहीच नव्हते. आपला माल विकला जावा, याकरिता व्यावसायिक, उद्योगपती किंवा अगदी रस्त्यावर बसणारा विक्रेता जशी खटाटोप करतो, अगदी तसाच तो प्रयत्न होता. यात अतिरेक होता, इतकेच. या लीगच्या निमित्ताने भारतातही काही मर्यादित शहरे वगळता फुटबॉल जिवंत आहे किंवा त्याचाही मोठा चाहता वर्ग आहे, हे प्रकर्षांने समोर आले. इंग्लिश प्रीमिअर लीग, ला लीगा, चॅम्पियन्स लीग आदी युरोपियन व इंग्लिश फुटबॉल स्पर्धाविषयी भरभरून बोलणारा भारतीय तरुण वर्ग आता आयएसएलवरही चर्चा करू लागला होता.

आंतरराष्ट्रीय स्तरांवरील आजी-माजी फुटबॉलपटूंची (अनेक खेळाडू निवृत्ती घेतलेलेच होते) मोट बांधून आयएसएलच्या पहिल्या हंगामाने मिळवलेले यश हे कौतुकास्पद नक्की होते. त्यामुळे यंदा आयएसएलकडून अपेक्षाही उंचावल्या होत्या. त्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी आयोजकांची कसोटी लागणार होती. त्यात त्यांना काही अंशी अपयश आले. कोची, गोवा, चेन्नई, कोलकाता ही मोजकीच शहरे वगळता आयएसएलच्या सामन्यांमधील प्रत्यक्ष प्रेक्षकसंख्या रोडावलेली दिसली. ईपीएल, ला लीगा पाहणाऱ्या युवा वर्गाला आयएसएल हे ‘गल्ली क्रिकेट’सारखे वाटू लागले. आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या तुलनेत भारतीय खेळाडूंचा खेळ संथ वाटत होता आणि त्यामुळेच फुटबॉलमधील आक्रमकता, गती याचा अभाव जाणवला. पहिल्या हंगामात हे खपवून घेतले गेले, पण प्रेक्षकांना गृहीत धरणे आयोजकांना महागात पडले. अजूनही भारतातील फुटबॉल हे रांगत्या अवस्थेतच आहे. याउलट आंतरराष्ट्रीय फुटबॉल प्रौढ झाले आहे. या दोघांनी सांगड घालण्यासाठी दोनच पर्याय आहेत-
पहिला : आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी भारतीय खेळाडूंच्या कलेने आणि आपल्या गतीला आवर घालून खेळ करणे व दुसरा : भारतीय खेळाडूंनी आपला स्तर उंचावणे. यापैकी पहिला पर्यायच अवलंबवला गेला अणि त्यामुळेच आक्रमक, थरारक अशी बिरुदावली लावण्यात येणारा फुटबॉल आयएसएलमध्ये रटाळवाणा झाला. दर्दी फुटबॉलप्रेमींना याचा स्वीकार करणे थोडे अवघडच आहे आणि त्यामुळेच दिवसेंदिवस आयएसएलची प्रत्यक्ष प्रेक्षकसंख्येतही घट झालेली दिसली. दुसरा पर्याय प्रत्यक्षात उतरवणे भारतीय खेळाडूंना पुढील पाच-दहा वष्रे जमेल असे वाटत नाही. कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर बालपणापासून खेळाचे धडे गिरवायला सुरुवात होते, अगदी वयाच्या पाचव्या वर्षांपासून. याउलट भारतीयांना १३-१४व्या वर्षी आपली वाटचाल नक्की कोणत्या दिशेने सुरू आहे, हे उमगते आणि त्यानंतर त्यांची दिशा ठरते. ही परस्परविरोधी परिस्थितीच भारतातील फुटबॉल क्षेत्रासाठी हानिकारक आहे.
आयएसएलच्या प्रशिक्षकांमध्ये झिको, रोबटरे कार्लोस, निकोलस अनेल्का, अँटोनिओ हबास, आदी दिग्गज माजी खेळाडू प्रशिक्षकाच्या भूमिकेत असल्यामुळे फुटबॉलचा दर्जा सुधारलेला पाहायला मिळाले, असेही काही झाले नाही. किंबहुना भारतीय खेळाडू त्यांची प्रशिक्षणाची शैली समजून घेण्यात कमी पडले असे म्हणायला हवे. त्यामुळेच या पैकी अनेकांनी पुढील वर्षी भारतात न येण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या हंगामात भारताच्या राष्ट्रीय संघातील खेळाडूंचाही खेळ अनुभवण्याची संधी मिळाली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंमधील ताळमेळाचा अभ्यासही करता आला. आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या गतीसोबत खेळण्यास भारतीय खेळाडूंना अजूनही फार कष्ट घ्यावे लागत आहेत. यावरूनच आपण अजून किती पिछाडलेलो आहोत, हे प्रकर्षांने जाणवले. २०१७मध्ये भारतात होणाऱ्या १७ वर्षांखालील विश्वचषक स्पध्रेच्या दृष्टीने आयएसएललाही अधिक महत्त्व प्राप्त झाले होते. त्यामुळे त्यांच्यावरील जबाबदारीही कित्येक पटीने वाढली होती. पण आयएसएलच्या दुसऱ्या हंगामाच्या शेवटच्या टप्प्याला ‘नव्याचे नऊ दिवस..’ असेच म्हणणे योग्य ठरेल.
..तरीही महसुलात वाढ
आयएसएलला जवळपास १०० कोटी रुपयांचा महसूल प्रायोजकांकडून मिळाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही रक्कम ५५ कोटी जास्त आहे. हिरो, मारुती या प्रायोजकांच्या यादीत यंदा फ्लिपकार्ट, एचपी इंटरप्राईज, डीएचएल आणि इम्पेरियल ब्ल्यू यांचा समावेश झाला. तसेच पेप्सी, प्युमा, मुथ्थुट ग्रुप यांनीही कराराचे नूतनीकरण केले. शीर्षक प्रायोजकासाठी हिरोने १८ कोटी रुपये मोजले, तर सहकारी प्रायोजकाने ७ ते ९ कोटींचा करार केला. गतवर्षी केवळ दहाच प्रायोजक असलेल्या आयएसएलने यंदा १५-१७ प्रायोजक मिळवले.

swadesh.ghanekar@expressindia.com