महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा

दुबळ्या आर्यलडला नमवून सलग तिसरा विजय मिळवण्यासाठी भारतीय महिला सज्ज

पहिल्या दोन सामन्यांत न्यूझीलंड व पाकिस्तान यांसारख्या बलाढय़ संघांना धूळ चारणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाचा आत्मविश्वास फार उंचावला आहे. त्यामुळे गुरुवारी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ‘ब’ गटात तुलनेने दुबळ्या आर्यलड संघाला पराभूत करून सलग तिसऱ्या विजयासह दिमाखात उपांत्य फेरीत धडक मारण्यासाठी हरमनप्रीत कौर व तिच्या युवा शिलेदार सज्ज झाल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाने सलग तीन सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली असल्याने भारतालादेखील याच सामन्यात उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित करण्याची संधी आहे. गयानामधील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार असून पहिले दोन सामने अनुक्रमे ऑस्ट्रेलिया व पाकिस्तानविरुद्ध गमावणाऱ्या आर्यलडला या लढतीत विजय मिळवणे अनिवार्य आहे. अन्यथा त्यांचे आव्हान साखळीतच संपुष्टात येण्याची शक्यता आहे.

कर्णधार हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने मात्र दोन्ही सामन्यांत दमदार कामगिरी करीत प्रतिस्पर्धी संघाला नेस्तनाबूत केले. स्वत: हरमनप्रीतला योग्य वेळी सूर गवसला असल्याने भारतीय फलंदाजीची ताकद वाढली आहे. स्मृती मानधना व तानिया भाटिया यांना अद्याप लौकिकाला साजेशी खेळी करता आलेली नसली, तरी गुरुवारी होणाऱ्या लढतीत ते आपला फॉर्म पुन्हा मिळवू शकतात. युवा जेमिमा रॉड्रिग्जनेदेखील प्रभावित केले असून पुढील सामन्यांतही संघाला तिच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा असेल. त्याशिवाय अनुभवी मिताली राज गरज पडल्यास संघाच्या फलंदाजीची धुरा वाहण्यासाठी सक्षम आहे.

गोलंदाजीत फिरकीपटू पूनम यादव व हयालन हेमलता या दोघांनी मिळून आतापर्यंत १० गडी गारद केले आहेत. त्यामुळे आर्यलडला भारताच्या फिरकीपटूंचे आव्हान पेलण्यासाठी खास तयारी करावी लागणार आहे, अन्यथा त्यांचा पराभव अटळ आहे.

पाकिस्तान, न्यूझीलंड यांसारख्या संघांना नमवल्यामुळे आत्मविश्वास बळावला आहे. मात्र ‘ब’ गटातून ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीतील स्थान आधीच पक्के केल्याने या सामन्यात विजय मिळवून चौथ्या साखळी लढतीपूर्वीच उपांत्य फेरी गाठण्याचे आमचे लक्ष्य आहे.

– हरमनप्रीत कौर, भारताची कर्णधार

संघ

भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, मिताली राज, वेदा कृष्णमूर्ती, एकता बिश्त, तानिया भाटिया, दयालन हेमलता, मानसी जोशी, पूनम यादव, अनुजा पाटील, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, राधा यादव.

आर्यलड : लॉरा डेलानी (कर्णधार), किम गार्थ, कॅसेलिया जॉयस, इसबेल जॉयस, शॉना कॉवनाग, गॅबी लेविस, सेलेस्टी रॅक, लारा मारिट्झ, अ‍ॅमी केनली, एलिमीयर रिचर्डसन, क्लेर शिलिंग्टन, लुसी ओरेली, रेबेका स्टोक, मॅरी वाल्ड्रन, कियारा मेटकाल्फ.

* सामन्याची वेळ : रात्री ८.३० वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १