२०१८ साली जकार्ता येथे पार पडलेल्या आशियाई खेळांमध्ये, ४ * ४०० मिश्र रिले प्रकारात रौप्य पदकाची कमाई करणाऱ्या भारतीय संघासाठी आनंदाची बातमी आहे. रौप्य पदकावरुन भारतीय संघाला सुवर्णपदकाचा मान मिळाला आहे. सुवर्णपदक विजेत्या बहारीन संघाचा एक खेळाडू उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळल्याने बहारीनच्या संघावर ही कारवाई करण्यात आली आहे. केमी अदेकोया या बहारीनचा खेळाडू उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळला, ज्यामुळे Athletics Integrity Unit (AIU) ने बहारीनच्या संघावर कारवाई करत भारतीय संघाला सुवर्णपदक बहाल केलं आहे.

आशियाई खेळादरम्यान भारतीय व्यवस्थापकांनी बहारीनच्या खेळाडूंनी आणलेल्या अडथळ्याबद्दल तक्रार केली होती. बहारीनच्या खेळाडूने हिमा दासच्या मार्गात अडथळा आणल्याचा आरोप भारताने केला होता. मात्र भारताचं हे अपील फेटाळून लावण्यात आलं, ज्यामुळे भारताला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. मोहम्मद अनस, एम.आर. पुवम्मा, हिमा दास, राजीव अरोकिया या भारतीय खेळाडूंनी ३:१५:७१ अशी वेळ नोंदवली होती. तर बहारीनच्या संघाने ३:११:८९ अशी वेळ नोंदवली होती. याव्यतिरीक्त महिलांच्या ४०० मी. अडथळ्यांच्या शर्यतीत चौथ्या स्थानावर राहिलेल्या भारताच्या अनु राघवनलाही बढती देत कांस्यपदक बहाल करण्यात आलं आहे.