मँचेस्टर : ९०च्या दशकात भारतापेक्षा पाकिस्तानचा संघ कैक पटीने सरस होता. पण आता परिस्थिती बदलली असून भारताचा संघ आमच्यापेक्षा सरस आहे, असे पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदने कबूल केले. पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी विश्वविजेते कर्णधार इम्रान खान यांनी कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करण्याचा सल्ला दिला होता. याविषयी सर्फराज म्हणाला, ‘‘आम्ही तिन्ही आघाडय़ांवर अपयशी ठरलो, हेच पराभवाचे प्रमुख कारण आहे. खेळपट्टी काहीशी ओली असल्यामुळे आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले होते. पण आम्हाला त्याचा फायदा उठवता आला नाही. आम्हाला नीटप्रकारे दडपणाचा सामना करता आला नाही. भारत याबाबतीत सरस असल्यामुळे ते आमच्यावर कुरघोडी करत आहेत.’’

सर्फराजच्या बिनडोक नेतृत्वावर शोएबची टीका

इस्लामाबाद : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने कर्णधार सर्फराज अहमदच्या बिनडोक नेतृत्वावर टीका केली आहे. ‘‘एखादा कर्णधार इतका बिनडोक कसा असू शकतो, हेच मला समजत नाही. आपली क्षमता फलंदाजी नसून गोलंदाजी आहे तसेच खेळपट्टी ओली नाही, हे माहीत असताना त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय का घेतला, हेच कोडे मला उमगलेले नाही. नाणेफेक जिंकून सर्फराजने अर्धा सामना जिंकला होता. तरीही त्याने प्रथम फलंदाजी स्वीकारली नाही. बिनडोक नेतृत्वाचा आणि संघ व्यवस्थापनाच्या मूर्खपणाचा हा नमुना आहे,’’ अशा शब्दांत शोएबने आगपाखड केली.

सर्फराज गोंधळलेला होता -सचिन

भारताविरुद्धच्या अतिमहत्त्वपूर्ण सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद काहीसा गोंधळलेला होता, तर त्यांच्या संघात कल्पनाविष्कारांचा अभाव जाणवत होता, असे मत भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकरने व्यक्त केले आहे. सचिन म्हणाला, ‘‘माझ्या मते, सर्फराज काहीसा गोंधळलेल्या अवस्थेत होता. वेगवान गोलंदाज वहाब रियाझ गोलंदाजी करत असताना त्याने शॉर्ट मिड-विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक ठेवला होता. पण फिरकीपटू शादाब खान गोलंदाजीला आला तेव्हा त्याने स्लिप लावली होती. अशा परिस्थितीत लेग-स्पिनरला चेंडूवर चांगली पकड मिळवता येत नाही. मोठय़ा सामन्यासाठी असा दृष्टिकोन योग्य नाही. कोणत्याही कल्पनांशिवाय ते या सामन्यात उतरले होते.’’