पात्रता असतानाही खेळाडूंसाठी असलेल्या कोटय़ातून प्रथमश्रेणीच्या शासकीय सेवेत सामावून घेण्यात येत नसल्याने नाराज असलेल्या आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतने राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले. आपल्यापेक्षा कमी कामगिरी केलेल्या आणि नंतर अर्ज केलेल्या खेळाडूंना थेट प्रथम श्रेणीच्या शासकीय सेवेत सामावून घेतल्याची तक्रोरही कविताने के ली आहे.

राज्यपालांची भेट घेऊन त्यांना आपल्यावरील अन्यायाची माहिती निवेदनाव्दारे दिली. आपण अनुसूचित जमातीतील असून अनेक वेळा भारताचे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व केलेले आहे. राष्ट्रकुल, आशिया क्रीडा स्पर्धा तसेच इतर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभागी होऊन पदक मिळविले आहे. २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकच्या मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला होता. शासनाचे अनेक पुरस्कारप्राप्त आहेत. शैक्षणिक पात्रता पदवीधर आहे. २०१४ मध्ये थेट शासकीय सेवेत प्रथमश्रेणीची नोकरी मिळावी म्हणून अर्ज केला होता. शासनाच्या निर्णयानुसार आपण शासकीय सेवेत थेट वर्ग एकच्या पदासाठी पात्र आहोत. परंतु नंतर अर्ज केलेल्या खेळांडूची नियुक्ती प्रथमश्रेणीमध्ये करण्यात आल्याचे निदर्शनास आले असल्याचे कविताने निवेदनात नमूद केले आहे.

कमी स्पर्धामध्ये सहभागी झालेल्या खेळांडूना शासकीय सेवेत सामावून घेण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागातून आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत नेत्रदीपक कामगिरी के लेली असताना आपल्यावर हा अन्याय का? माझ्याप्रमाणेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी करणाऱ्या अनेक खेळाडूंवर शासकीय सेवेत नोकरी मिळण्यासाठी अन्याय होत आहे. आदिवासी भागातील खेळाडूंवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी नुकतीच राज्यपालांची भेट घेतली. त्यांच्याकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.   – कविता राऊत -तुंगार, धावपटू