18 January 2018

News Flash

आर्मस्ट्राँगचे ऑलिम्पिक पदक काढून घेणार

उत्तेजक प्रकरणात सहभागी असल्यामुळे विख्यात सायकलपटू लान्स आर्मस्ट्राँग याने २००० सिडनी ऑलिम्पिकमध्ये मिळवलेले कांस्यपदक काढून घेण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) घेतला आहे. आर्मस्ट्राँगने ऑलिम्पिक

एपी, लंडन | Updated: January 18, 2013 3:26 AM

उत्तेजक प्रकरणात सहभागी असल्यामुळे विख्यात सायकलपटू लान्स आर्मस्ट्राँग याने २००० सिडनी ऑलिम्पिकमध्ये मिळवलेले कांस्यपदक काढून घेण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) घेतला आहे. आर्मस्ट्राँगने ऑलिम्पिक पदक परत करावे, अशा आशयाचे पत्र आयओसीने त्याला पाठवल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितल्याचे समजते.
अमेरिकेच्या उत्तेजकविरोधी संस्थेने आर्मस्ट्राँगच्या कृष्णकृत्याचा अहवाल आंतरराष्ट्रीय सायकलिंग समितीकडे सुपूर्द केला होता. त्यानंतर आर्मस्ट्राँगकडील टूर डी फ्रान्स शर्यतीची सात जेतेपदे काढून घेण्यात आली होती आणि आर्मस्ट्राँगवर आजीवन बंदी घालण्यात आली होती. २१ दिवसांची मुदत पालटून गेली तरी या विरोधात आर्मस्ट्राँगने अपील केले नसल्यामुळे आयओसीने त्याच्याकडून ऑलिम्पिक पदक हिरावून घेण्याचे पाऊल उचलले आहे. याबाबतची जाहीर घोषणा झाली नसल्यामुळे आयओसीच्या पदाधिकाऱ्यांनी आपले नाव उघड करणे टाळले आहे.
अमेरिकेच्या ऑलिम्पिक महासंघाने पदक परत करण्याविषयीचे पत्र आर्मस्ट्राँगला पाठवले आहे. २०००मध्ये टूर डी फ्रान्स शर्यतीचे दुसरे जेतेपद पटकावल्याच्या दोन महिन्यानंतर आर्मस्ट्राँगने सिडनी ऑलिम्पिकमध्ये सायकलिंग प्रकारात कांस्यपदक मिळवले होते. सिडनी ऑलिम्पिकमध्ये चौथे स्थान पटकावणारा स्पेनचा सायकलपटू अब्राहम ओलानो मॅन्झानो याला तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्यात येणार असून त्यालाच हे कांस्यपदक दिले जाईल. आर्मस्ट्राँगचा सहकारी टायलर हॅमिल्टन याने २००४ अ‍ॅथेन्स ऑलिम्पिकमध्ये पटकावलेले सुवर्णपदक आयओसीने काढून घेतले होते. उत्तेजके घेतल्याचे हॅमिल्टन याने मान्य केल्यानंतर त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. त्याचबरोबर २००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावणारा आर्मस्ट्राँगचा सहकारी लेव्ही लेअफेयमेर याचीसुद्धा उत्तेजकाच्या आरोपावरून चौकशी सुरू आहे. आर्मस्ट्राँग आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात अमेरिकेच्या उत्तेजकविरोधी संस्थेने अहवाल सादर केल्यानंतर आयओसीनेही या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. आतापर्यंतच्या क्रीडा इतिहासातील सर्वात अत्याधुनिक आणि सुविकसित अशी उत्तेजके घेतल्याचे या अहवालात म्हटले होते.

मुलाखत पाहून निर्णय घ्या
ऑप्रा विन्फ्रे हिला दिलेली मुलाखत पाहूनच माझ्याविषयीचा निर्णय घ्या, असे आवाहन सात वेळा टूर डी फ्रान्स सायकल शर्यतीचे जेतेपद पटकावणाऱ्या लान्स आर्मस्ट्राँगने चाहत्यांना केले आहे. ‘‘आता मी माझ्याविषयीचा निर्णय चाहत्यांवर सोपवला आहे. मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतरच ते निर्णय घेऊ शकतील,’’ असे आपल्यावरील टीकेला उत्तर देताना आर्मस्ट्राँगने सांगितले. विन्फ्रे हिने घेतलेल्या मुलाखतीत आर्मस्ट्राँगने उत्तेजक द्रव्य घेतल्याचे कबूल केले आहे. अमेरिकेच्या उत्तेजकविरोधी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशीही त्याने संवाद साधला आहे. ‘‘माझे भवितव्य काय असेल, याची मला कल्पना नाही,’’ असेही त्याने सांगितले.

First Published on January 18, 2013 3:26 am

Web Title: ioc strips armstrong of olympic medal
  1. No Comments.