आयपीएलच्या सातव्या पर्वातील सर्वात सातत्यपूर्ण कामगिरी करणारा संघ अशी किंग्ज इलेव्हन पंजाबने आपली नवी ओळख निर्माण केली आहे. वर्षांनुवष्रे झगडणाऱ्या या संघाला यंदा ग्लेन मॅक्सवेलच्या परिसस्पर्शाने ‘अच्छे दिन आयें है’ असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या संघाची मालकीण प्रीती झिंटाला कधी नव्हे इतके आनंदाचे क्षण यंदा वाटय़ाला आले आहेत. पण आता मार्ग खडतर आहे. ईडन गार्डन्सच्या ऐतिहासिक मैदानावर यजमान कोलकाता नाइट रायडर्सशी पंजाबचा संघ मंगळवारी भिडणार आहे. ‘क्वालिफायर-१’चा हा सामना जिंकणारा संघ रविवारी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर अंतिम सामना खेळेल आणि हरणाऱ्या संघाला मुंबईत वानखेडे स्टेडियमवरील ‘क्वालिफायर-२’चा अडसर पार करण्याचे आणखी एक आव्हान समोर असेल.
किंग्ज इलेव्हन पंजाबने प्रारंभापासून आपला दबदबा टिकवून ठेवत गटविजेत्याच्या थाटात ‘प्ले-ऑफ’मध्ये प्रवेश केला. परंतु कोलकाता नाइट रायडर्ससाठी तितकी अनुकूल परिस्थिती नक्कीच नव्हती. पहिल्या सात सामन्यांपैकी फक्त दोन विजय मिळवणारा हा संघ स्पध्रेच्या मध्यावर त्वेषाने उफाळून आला. सांघिक कामगिरीसाठी आणि धावांसाठी झगडणाऱ्या कर्णधार गौतम गंभीरच्या फॉर्मवर त्यावेळी बरीच टीका झाली होती. पण अचानक त्यांचे नशीब पालटले. रॉबिन उथप्पाच्या तंत्रशुद्ध फलंदाजीने या यशात सिंहाचा वाटा उचलला. साखळीच्या अखेरच्या लढतीत युसूफ पठाणने वादळी फलंदाजीचा प्रत्यय घडवला. फक्त २२ चेंडूंत ७२ धावांची धडाकेबाज खेळी साकारून त्याने कोलकाताला निव्वळ धावगतीच्या बळावर दुसऱ्या स्थानावर पोहोचवले. कोलकाताचा संघ सलग सात सामने जिंकून घरच्या मैदानावर परतला आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये एकीकडे किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ महासत्ता म्हणून उदयाला आला आहे, परंतु कोलकाता नाइट रायडर्सची सध्याची घोडदौड रोखणे कठीण गोष्ट आहे. ईडन गार्डन्सवर कोलकाता संघाला रोखणे, हे पंजाबसाठी कठीण ठरणार आहे.
सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्यात युसूफच्या आक्रमणाने क्रिकेटरसिकांना मंत्रमुग्ध केले. त्याने आपल्या खेळीत पाच चौकार आणि सात षटकार ठोकले. त्याने डेल स्टेनसारख्या गोलंदाजाचीही त्याने तमा बाळगली नाही. चेन्नई सुपर किंग्जला दुसऱ्या स्थानावरून हुसकावण्यासाठी कोलकाता नाइट रायडर्सला १६१ धावांचे लक्ष्य १५.२ षटकांत पूर्ण करण्याची आवश्यकता होती. परंतु युसूफच्या स्फोटक फलंदाजीमुळे हे आव्हान फक्त १४.२ षटकांत आवाक्यात आले. नेमकी अशीच अनुभूती रविवारी मुंबई इंडियन्सने दिली. मुंबई इंडियन्सने अपेक्षित लक्ष्य अनपेक्षितपणे गाठत निव्वळ धावगतीच्या बळावर राजस्थान रॉयल्सचे धावांचे शिखर सहजगत्या पादाक्रांत केले. कोरे अँडरसनने फक्त ४४ चेंडूंत नाबाद ९५ धावांची खेळी साकारत यात महत्त्वाची भूमिका बजावली.
‘पर्पल कॅप’धारक जादुई फिरकी गोलंदाज सुनील नरिन आणि डावखुरा फिरकी गोलंदाज शाकिब अल हसन हे दोघे कोलकाता संघाची बलस्थाने आहेत. आयपीएलच्या चालू मोसमात मॅक्सवेल सहा वेळा लेग-स्पिनर गोलंदाजाचा शिकार ठरला आहे. याची कोलकाताला पुरती जाणीव आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात मॅक्सवेलला विश्रांती देण्यात आली होती, तर मागील तीन सामन्यांत त्याच्याकडून फक्त १६ धावा झाल्या आहेत. रविवारी दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध त्याला भोपळाही फोडता आला नव्हता. ही वस्तुस्थिती पंजाबसाठी नक्कीच चिंताजनक आहे.
संघ
कोलकाता नाइट रायडर्स : गौतम गंभीर (कर्णधार), रॉबिन उथप्पा (यष्टीरक्षक), मनीष पांडे, युसूफ पठाण, शाकिब अल हसन, रयान टेन डोइश्चॅट, सूर्यकुमार यादव, मॉर्नी मॉर्केल, उमेश यादव, आर. विनय कुमार, सुनील नरिन, जॅक कॅलिस, आंद्रे रसेल, पॅट कमिन्स, ख्रिस लिन, मनविंदर बिस्ला, देवव्रत दास, कुलदीप यादव, सयान मोंडल आणि वीरप्रताप सिंग.
किंग्ज इलेव्हन पंजाब : जॉर्ज बेली (कर्णधार), वीरेंद्र सेहवाग, मनन व्होरा, ग्लेन मॅक्सवेल, डेव्हिड मिलर, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, मिचेल जॉन्सन, रिशी धवन, करणवीर सिंग, परविंदर अवाना, ब्युरान हेंड्रिक्स, शॉन मार्श, लक्ष्मीपती बालाजी, मुरली कार्तिक, चेतेश्वर पुजारा, संदीप सिंग, गुरकिराट सिंग मान, मनदीप सिंग, शिवम शर्मा आणि शार्दुल ठाकूर.
सामन्यावर पावसाचे सावट
कोलकातामध्ये रविवारी मुसळधार पाऊस पडल्यामुळे खेळपट्टी झाकून ठेवण्यात आली आहे. मंगळवारीसुद्धा पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे कोलकाता नाइट रायडर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यतील सामन्यावर अनिश्चिततेचे सावट आहे. या सामन्यासाठी २८ मे या राखीव दिवसाची तरतूद करण्यात आली आहे. या वातावरणामुळे खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना अनुकूल ठरू शकेल. दोन्ही संघांना सोमवारी सराव करता आला नाही.