स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याची कुवत असणारे खेळाडू संघात असूनही नेहमी जेमतेम राहिलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाची सह-मालक असलेली अभिनेत्री प्रिटी झिंटा हिने तिच्या करिअरसंबंधीचा एक गोप्यस्फोट केला. किंग्ज इलेव्हन संघाला आयपीएलच्या आजवरच्या प्रत्येक पर्वात निराशेला सामोरे जावे लागले असले तरी संघाच्या प्रत्येक सामन्यात प्रिती झिंटा संघाच्या पाठिशी उभी राहताना आपल्याला दिसली. प्रिती संघाच्या प्रत्येक सामन्यात खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी आवर्जुन उपस्थित राहते. नुकतेच तिने ‘दि इंडियन एक्स्प्रेस डॉटकॉम’ला खास मुलाखत दिली. यात प्रितीने आयपीएलमधील आपल्या एकंदर अनुभवांचे कथन केले. याशिवाय, अनेक किस्सेही सांगितले.

आयपीएल एकाप्रकारे आपल्या जीवनाचाच भाग झाल्याचे प्रिती म्हणाली. आयपीएलच्या गेल्या ९ पर्वात एकदाही जेतेपद मिळालेले नसतानाही संघाशी जुळवून घेणे कसं जमलं? असं विचारण्यात आले असता प्रिती म्हणाली की, ”बॉलीवूड सोडून वेगळा काहीतरी प्रयत्न करण्याचं हे माझं पहिलं पाऊल होतं. त्यामुळे संघावर सुरूवातीपासूनच खूप विश्वास होता. किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी मी सिनेमांवर पाणी सोडले. पंजाबचा संघ हा माझ्या मुलासारखाच आहे म्हणूनच या संघासोबत जास्तीत जास्त सामने जिंकण्यासाठी मी उत्सुक आहे.”

 

आयपीएलमध्ये अनेक युवा खेळाडूंची पारख होते. अनेकांना संधी मिळते याचाही उल्लेख प्रितीने केला. ”आयपीएलमुळे तळागळातून सर्वोत्तम खेळाडूंची पारख होते. युवा खेळाडू समोर येतात. यामुळेही मी या स्पर्धेशी जोडली गेली. देशातील युवा खेळाडू आपल्या कौशल्य सिद्ध करण्यासाठी झटत असतात आणि हे पाहून मला खूप आनंद होतो. एकापद्धतीने मी देशात घडणाऱ्या या बदलांचा स्वत:ला एक भाग समजते.”, असेही प्रिती म्हणाली.

क्रिकेटमध्ये निर्माण झालेली आवड ही खरंतर आयपीएलमुळे अधिक वाढत गेल्याचेही प्रितीने मान्य केले. ”खेळांची मला तशी आवड होती. पण आयपीएलमुळे माझ्या आवडीला आणखी बळ मिळालं. मी आयपीएलपूर्वी क्वचितच क्रिकेट सामने पाहायचे, पण आता क्रिकेटमधले बरेच खाचखळगे आता समजू लागले आहेत याचा आनंद आहे.”, असे प्रितीने सांगितले.