दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर हशीम अमला आणि ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड मिलर यांनी भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी खेळला नाही, तर जागतिक क्रिकेटचं खूप मोठं नुकसान होईल, असे मत व्यक्त केले. आयसीसीकडून मिळणाऱ्या हिश्श्यावरून बीसीसीआय नाराज असल्याने येत्या जूनमध्ये होणाऱ्या आयसीसीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघ खेळण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जात आहे. शिवाय, बीसीसीआयने अद्याप स्पर्धेसाठीच्या भारतीय संघाची घोषणा देखील केलेली नाही. या पार्श्वभूमीवर डेव्हिड मिलरने पीटीआयला दिलेल्या मुखातीत म्हटले की, ”जर भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी खेळला नाही, तर क्रिकेटचं खूप मोठं नुकसान होईल. कारण, जगभरात भारतीय क्रिकेटचे प्रचंड फॉलोअर्स आहेत. त्यामुळे स्पर्धेच्या आयोजकांना याचा नक्कीच धक्का बसेल.”

हशीम अमलानेही भारताच्या अनुपस्थितीमुळे स्पर्धेच्या लोकप्रियतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल, असे मत व्यक्त केले. ”भारताने माघार घेतली, तर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी हा खूप मोठा धक्का ठरेल. स्पर्धेच्या लोकप्रियतेत प्रचंड घट होईल. जर आपल्याला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची खरी रंगत पाहायची असेल तर क्रमवारीतील सर्व आठ संघ यात समाविष्ट व्हायला हवेत.”, असे अमला म्हणाला.

भारताने माघार घेतली तर त्यांच्या जागी कोणत्या संघाला संधी देण्यात येईल याबाबत कोणतीच कल्पना नाही. तसेच आयसीसीकडून नेमका कोणता निर्णय घेण्यात येईल याचाही अंदाज आपण व्यक्त करू शकत नसल्याचे डेव्हिड मिलर म्हणाला.

दरम्यान, बीसीसीआयची येत्या ७ मे रोजी विशेष सर्वसाधारण बैठक होणार आहे. या बैठकीत चॅम्पियन्स ट्रॉफीतील सहभागी होण्याबाबतचा निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या बैठकीवर सर्वांचे लक्ष असणार आहे.