बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आपला डावखुरा जलदगती गोलंदाज मुस्तफिजुर रेहमानला आयपीएलच्या आगामी लिलावात सहभागी होण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे. १९ डिसेंबरला कोलकाता शहरात आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा लिलाव पार पडणार आहे. ऑस्ट्रेलियात २०२० सालात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीकोनातून मुस्तफिजुर रेहमानसाठी आयपीएल ही स्पर्धा अतिशय महत्वाची असल्याचं मत बांगलादेशी क्रिकेट बोर्डाने व्यक्त केलं आहे. याआधी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने मुस्तफिजुरच्या दुखापतीमुळे त्याला लिलावात सहभागी होण्याची परवानगी दिली नव्हती.

मुस्तफिजुर रेहमानसोबत, तमिम इक्बाल, मेहदी हसन, सौम्या सरकार, मेहमद्दुल्ला आणि तस्किन अहमद हे देखील लिलावात सहभागी होणार आहेत. “मध्यंतरी त्याच्या दुखापतीमुळे आम्ही त्याला लिग क्रिकेटमध्ये सहभागी व्हायला नकार दिला होता. मात्र आता तो सावरला आहे, स्थानिक क्रिकेटमधील काही सामन्यांमध्ये त्याने चांगला खेळ केलाय. आयपीएलमध्ये त्याला संधी मिळाल्यास आगामी टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीकोनातून आमच्यासाठी हे चांगलं आहे.” बांगलादेशी क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अक्रम खान यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली. नुकत्याच भारताविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेतही मुस्तफिजुर सहभागी झाला होता, मात्र त्याला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नव्हती.

आतापर्यंत मुस्तफिजुर रेहमानने २४ आयपीएल सामने खेळले असून, त्याच्या नावावर केवळ २४ बळी जमा आहेत. आगामी हंगामाच्या लिलावासाठी ७१३ भारतीय तर २५८ परदेशी खेळाडूंनी आपली नावं नोंदवली आहेत. त्यामुळे ८ संघात मिळून शिल्लक असलेल्या ७३ जागांसाठी कोणत्या खेळाडूंना संधी मिळते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : भाजपा खासदार दिल्ली कॅपिटल्स संघाचा सहमालक होण्याच्या तयारीत