देशात करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता, बीसीसीआयने २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर स्पर्धेबद्दल निर्णय घेतला जाईल असं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने स्पष्ट केलं होतं. मात्र, इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, बीसीसीआयने यंदाच्या हंगामाची आयपीएल स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल अद्याप अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. पण येत्या काही दिवसात बीसीसीआय ही घोषणा करण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सध्या देशात लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. १५ एप्रिलनंतर परदेशी खेळाडूंच्या व्हिसाबद्दल केंद्र सरकार काय निर्णय घेतं यानंतर बीसीसीआय अधिकृत घोषणा करण्याचे संकेत मिळत आहेत.

यंदाच्या हंगामाची स्पर्धा रद्द झाल्यास स्पर्धा थेट पुढील वर्षात खेळवण्यात येईल. त्यामुळे २०२१ साली प्रस्तावित Mega Auction होणार नसल्याचंही समजतंय. संघमालकांना खेळाडूंची अदलाबदल करण्याची मुभा देण्यात येऊ शकते. “यंदा आयपीएल स्पर्धा होणार नाही, ती पुढील वर्षात होईल. सध्या देशात काय परिस्थिती आहे हे सर्व जण पाहत आहेत आणि कोणीही धोका पत्करायला तयार नाही. मैदानात Social Distancing करणं हे अवघड आहे. त्यामुळे आयपीएल पुढील वर्षात खेळवणं योग्य राहिल. पुढील वर्षात Mega Auction ही होणार नाही. केंद्र सरकारकडून परदेशी खेळाडूंच्या व्हिसाबद्दल ठोस निर्णय आल्यानंतर सर्व संघमालकांना याबद्दल कळवलं जाईल.” आयपीएल प्रशासनातील सुत्रांनी इंडियन एक्स्प्रेसला माहिती दिली.

१४ मार्च रोजी बीसीसीआय आणि संघमालकांच्या बैठकीत आयपीएल १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय झाला. खेळाडूंची सुरक्षा ही महत्वाची असल्याचं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने स्पष्ट केलं होतं. याचसोबत भारतासोबत सध्या संपूर्ण जग करोना विषाणूशी लढत असल्यामुळे आयपीएल देशाबाहेर नेण्याचा पर्याययी नसल्याचं गांगुलीने स्पष्ट केलं होतं. खबरदारीचा उपाय म्हणून बीसीसीआयने आपल्या सर्व स्थानिक स्पर्धांचे सामनेही रद्द केले आहेत.