IPL 2021साठी चेन्नईमध्ये आज लिलाव झाला. ख्रिस मॉरिस, ग्लेन मॅक्सवेल आणि काइल जेमिसन सारख्या परदेशी खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांची बोली लागली. तर केदार जाधव, हरभजन सिंह, करूण नायर यांना मूळ किमतीत विकत घेतलं गेलं. IPLच्या लिलावात यंदा भारताचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा यानेही आपलं नाव नोंदवलं होतं. कसोटीपटू असा लौकिक असलेल्या चेतेश्वर पुजाराला विकत घेण्याचं धैर्य कोण दाखवणार अशी चर्चा होती. पण धोनीच्या चेन्नई संघानं त्याला आपल्या गोटात सामिल करुन घेतलं आहे. चेन्नईने त्याला विकत घेणं ही एकप्रकारे त्याच्या खेळाप्रति दाखवलेला आदरच होता. त्यामुळे पुजारा चेन्नईत दाखल होताच लिलावासाठी उपस्थित साऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

पाहा व्हिडीओ-

अनुभवी चेतेश्वर पुजाराला त्याच्या मूळ किंमतीमध्ये म्हणजेच ५० लाख रुपयांत चेन्नईनं आपल्या गोटात घेतलं. लिलावापूर्वी सोशल मीडियावर पुजाराला चेन्नई संघ घेण्यास इच्छुक असल्याची चर्चा होती. अखेर चेन्नईने अनुभवी पुजाराला संघात स्थान दिलं. टेस्ट स्पेशालिस्ट चेतेश्वर पुजाराला तीन वेळा आयपीएल जिंकणाऱ्या चेन्नई संघाने खरेदी केलं. टी-२० स्पर्धा आणि तडाखेबंद फलंदाजीच्या या स्पर्धेत पुजारासारख्या एका तंत्रशुद्ध खेळाडूला विकत घेणं म्हणजे चेन्नईने पुजाराच्या खेळाला केलेला सलामच आहे अशी भावना सोशल मीडियावर दिसून आली.