आयपीएल २०२१ स्पर्धेत मुंबई इंडियन्सनं एकूण ४ सामने खेळले आहेत. त्यापैकी दोन सामन्यात विजय, तर दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. बंगळुरु आणि दिल्ली विरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे कर्णधार रोहित शर्माने आपल्या फलंदाजीत बदल करण्याचं ठरवलं आहे. चेन्नईतील खेळपट्टी धीमी असल्याचा अंदाज त्याने मागच्या चार सामन्यात घेतला आहे. त्यासाठी फलंदाजीत आवश्यक बदल करण्याचं त्यानं निश्चित केलं आहे. मुंबई इंडियन्सनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात रोहित शर्मा खास रणनिती आखताना दिसत आहे. पंजाब विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा या खास रणनितीची अमलबजावणी करेल असं यातून दिसत आहे.

“चेन्नईच्या खेळपट्टीवर फलंदाजी करताना अडचणी येत आहेत. मात्र अशा परिस्थितीतही चांगली फलंदाजी करुन संघाला चांगली धावसंख्या उभी करुन देणं महत्त्वाचं आहे. १५५-१६० ही धावसंख्या प्रतिस्पर्धी संघाला अडचणीची ठरू शकते. यासाठी मी फलंदाजी करण्याचं एक आव्हान स्वीकारलं आहे. मी गोलंदाजांना सांगितलं आहे की, तुम्ही तुमच्या गोलंदाजीनुसार क्षेत्ररक्षण लावा. मी एकही शॉट वरून मारणार नाही. यावेळी १७ चेंडूचा सामना केला. त्यात मी १२ धावा केल्या. त्यात ५ चेंडू निर्धाव गेले.” , असं रोहित शर्मानं व्हिडिओत सांगितलं आहे.

व्हिडिओत रोहितनं एकही चेंडू वरून मारला नाही. व्हिडिओ दरम्यान रोहित चेंडू आणि धावा मोजताना दिसतोय. रोहितनं ३४ चेंडूत ३४ धावा केल्या. त्यानंतर त्याने ५० चेंडूचा सामना करायचा असं सांगितलं. स्ट्राइक रेट १०० ठेवायचा असं त्याने पुढे सांगितलं. त्यामुळे ५० चेंडूत ५० होतील असं त्याने पुढे सांगितलं. चेन्नईची खेळपट्टी धीमी होते आणि चेंडू फिरतो. त्यामुळे स्ट्राइक रोटेट केल्याने फायदा होईल असं त्याचं म्हणणं आहे.

श्रेयस गोपाळमुळे ‘बुमराह, हरभजन आणि अश्विन’ राजस्थानच्या संघात!

बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात रोहित ९ धावा करत धावचीत झाला आणि तंबूत परतला. कोलकाताविरुद्ध ३२ चेंडूत ४३ धावांची खेळी केली. यात ३ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. हैदराबादविरुद्धही रोहितनं २५ चेंडूत ३२ धावांची खेळी केली. यात २ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. दिल्ली विरुद्धही रोहितनं ३० चेंडूत ४४ धावांची खेळी केली. यात ३ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता.