करोनाच्या दुसऱ्या लाटेनं संपूर्ण देशात कहर केला आहे. रोजच करोना रुग्णांचाा आकडा लाखोंच्या घरात पोहोचत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. तसेच अपुऱ्या वैद्यकीय सुविधांमुळे रुग्णांचे हाल होत आहेत. ऑक्सिजन, औषधं आणि रुग्णालयात बेडसाठी रांगा लागल्या आहेत. त्यात लसीकरण मोहीम मंदावल्याने रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत नाही. करोनाची साखळी तोडण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर आहे. संकटात अडकलेल्या भारताला इतर देशांकडून मदतीचा हात मिळत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज मंडळीही मदतीचा हात पुढे करत आहेत. आता आयपीएल स्पर्धेत खेळणारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुही या मोहीमेत सहभागी झाली आहे. येणाऱ्या सामन्यात निळ्या रंगाची जर्सी परिधान करून मैदानात उतरणार आहे.

करोना संकटात मोलाची जबाबदारी बजावण्याऱ्या फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांचं या माध्यमातून समर्थन केलं जाणार आहे. संकट काळात करत असलेल्या कामाची जाणीव करून दिली जाणार आहे. त्यामुळे येत्या सामन्यात लाल जर्सी ऐवजी विराटसेना निळ्या रंगाच्या जर्सीत दिसणार आहे. या जर्सीवर सर्व खेळाडूंची सही देखील आहे. सामन्यानंतर या जर्सीचा लिलाव करण्यात येणार आहे. मिळालेल्या पैशांतून ऑक्सिजन पुरवठ्यासाठी मदत केली जाणार आहे.

आरसीबीनं ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. आरसीबीच्या ट्विटनंतर सोशल मीडियावर या कृतीचं कौतुक होत आहे. नेटकरीही या कल्पनेला पसंती देत आहेत.

IPL २०२१ : चेन्नईविरुद्ध पोलार्डचा वन मॅन शो!

बंगळुरुची विराटसेना आयपीएल गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. आतापर्यंत एकूण ७ सामने खेळले असून त्यापैकी ५ सामन्यात विजय तर २ सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. बंगळुरुचा उद्या (३ मे) कोलकातासोबत सामना आहे. त्यामुळे या सामन्यात विराटसेना निळ्या जर्सीत दिसणार आहे.