कुटुंबातील दोन सदस्यांना करोनाची लागण झाल्यामुळे भारताचे अव्वल पंच नितीन मेनन यांनी यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग ट्वेन्टी-२० क्रिकेटमधून माघार घेतली आहे.

पत्नी आणि आईला करोनाची बाधा झाल्यामुळे इंदूरनिवासी मेनन यांनी ‘आयपीएल’च्या जैव-सुरक्षा परिघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) विशेष श्रेणीतील पंचांमध्ये भारताच्या फक्त मेनन यांचा समावेश आहे. भारतात नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले जात होते.

‘‘कुटुंबातील सदस्यांना करोनाची लागण झाल्यामुळे आपली मानसिक स्थिती सामन्यात पंचगिरी करण्यासाठी योग्य नसल्याचे मेनन यांनी स्पष्ट करीत स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला,’’ असे मेनन यांनी सांगितले.

मातृशोकामुळे सामनाधिकारी मनू नायर ‘आयपीएल’बाहेर

*  मातृशोकामुळे सामनाधिकारी मनू नायर यांनी अहमदाबादच्या ‘आयपीएल’ जैव-सुरक्षा परीघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी झालेल्या दिल्ली आणि बेंगळूरु या सामन्याला त्यांनी पंचगिरी केली होती. ‘‘बुधवारी रात्री नायर यांच्या आईचे झोपेतच निधन झाले. हे वृत्त कळल्यानंतर ते दिल्लीला रवाना झाले आहेत. ते स्पर्धेत परततील का, याविषयी खात्री नाही,’’ असे सूत्रांनी सांगितले.

विमान रद्द झाल्याने रॅफेल पंचगिरीसाठी कार्यरत

*  मायदेशी जाणारे विमान रद्द झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाचे पंच पॉल रॅफेल यांनी ‘आयपीएल’मध्ये कार्यरत राहण्याचा निर्णय घेतला आहे. भारतामधील रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्यामुळे ऑस्ट्रेलिया सरकारने हवाई वाहतूक स्थगित केली आहे. या पार्श्वभूमीवर रॅफेल यांनी ऑस्ट्रेलियात तातडीने परतण्याचा निर्णय घेतला. परंतु हे प्रयत्न अपयशी ठरल्याने त्यांनी पुढील सामन्यांसाठी कार्यरत राहण्याचा निर्णय घेतला. ‘‘भारतामधील करोनाच्या स्थितीचा आढावा घेऊन मी दोहामार्गे मायदेशी परतण्यासाठी प्रयत्न केला. त्या दृष्टीने तिकीटसुद्धा खरेदी केले. परंतु हवाई प्रवास निर्बंधांमुळे ते रद्द करण्यात आले,’’ असे रॅफेल यांनी सांगितले. त्यामुळे रॅफेल आता ‘आयपीएल’ संपल्यानंतर म्हणजे ३० मेनंतरच माघारी परतू शकतील.