इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पुढील पर्वासाठी खेळाडूंचा लिलाव १९ डिसेंबर रोजी कोलकाता येथे होणार आहे, असे मंगळवारी गव्हर्निग कौन्सिलच्या बैठकीत ठरवण्यात आले.

एप्रिल-मे महिन्यात रंगणाऱ्या आयपीएलच्या १३व्या पर्वासाठी खेळाडूंचा लिलाव पहिल्यांदाच कोलकाता येथे होत आहे. ‘‘साधारणपणे बेंगळूरु येथे आयपीएलचा लिलाव होत असतो. पण यंदा आम्ही कोलकाताची निवड केली आहे,’’ असे गव्हर्निग कौन्सिलच्या सदस्याने सांगितले.

२०१९च्या मोसमासाठी फ्रँचायझींना खेळाडू विकत घेण्यासाठी ८२ कोटी रुपयांची रक्कम खर्च करण्याची परवानगी देण्यात आली होती. २०२०च्या मोसमासाठी ही मर्यादा आता ८५ कोटी रुपये इतकी करण्यात आली आहे. फ्रँचायझींना गेल्या मोसमातील शिल्लक रक्कम या मोसमात खर्च करता येणार आहे. दिल्ली कॅपिटल्सकडे सर्वाधिक ८.२ कोटी रुपयांची, राजस्थान रॉयल्सकडे ७.१५ कोटी रुपयांची तर कोलकाता नाइट रायडर्सकडे ६.०५ कोटी रुपयांची रक्कम शिल्लक आहे.

चेन्नई सुपर किंग्ज (३.२ कोटी रुपये), किंग्स इलेव्हन पंजाब (३.७ कोटी रुपये), मुंबई इंडियन्स (३.५५ कोटी रुपये), रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु (१.८० कोटी रुपये) आणि सनरायजर्स हैदराबाद (५.३० कोटी रुपये) यांनाही उर्वरित रक्कम खर्च करता येणार आहे.