बीसीसीआयच्या वरिष्ठ कार्यकारणी सभेच्या बैठकीत, यंदाची स्पर्धा युएईमध्ये भरवण्यावर एकमत झाल्याचं कळतंय. आयसीसीने टी-२० विश्वचषकाबद्दल निर्णय घेतल्यानंतर बीसीसीआय भारत सरकारकडे देशात आयपीएल आयोजनाबद्दल परवानगी मागेल, तोपर्यंत परिस्थितीत सुधारणा न झाल्यास यंदाची स्पर्धा युएईमध्ये भरवण्यात येईल. बीसीसीआयने अद्याप याबाबत अधिकृत निर्णय जाहीर केलेला नसला तरीही संघमालकांनी परदेशवारीची तयारी सुरु केल्याचं समजतंय. यात खेळाडूंसाठी चार्टर्ड विमानाची सोय ते हॉटल बुकींची चौकशी करण्यापर्यंत काही संघमालकांनी सुरुवात केली आहे.

अवश्य वाचा – आयपीएलची परदेशवारी यंदा जवळपास निश्चित !

आयपीएलमधील एका संघाच्या अधिकाऱ्याने IANS वृत्तसंस्थेला याबद्दल माहिती दिली. “प्रत्येकाविषयी सांगता येणार नाही, पण बहुतांश संघाच्या मॅनेजमेंटने चार्टर्ड विमानाची सोय होतेय का हे तपासायला सुरुवात केलीये. यंदाची स्पर्धा युएईत आयोजित करण्याचं ठरल्यास ऑगस्ट महिन्याअखेरीस नॉर्मल विमानाची सोय असेल का याबद्दल प्रत्येकाच्या मनात संभ्रम आहे. ऑगस्टचा अखेरचा आठवडा किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रत्येक संघाला आपल्या खेळाडूंना युएईमध्ये न्यायचं आहे. प्रत्येक संघात खेळाडूंसह ३५-४० जणं असतात, त्यामुळे अशा परिस्थितीत चार्टर्ड विमानांची सोय करणं हाच एकमेव पर्याय उरतो.”

याआधीही दोनवेळा आयपीएलचं आयोजन भारताबाहेर करण्यात आलं होतं. २००९ साली दक्षिण आफ्रिकेत तर २०१४ साली सुरुवातीचे काही सामने UAE मध्ये भरवण्यात आले होते. दरम्यान खेळाडूंचा क्वारंटाइन काळ हा युएई ऐवजी भारतात पूर्ण व्हावा अशीही अनेक संघमालकांची मागणी आहे. त्यामुळे आयसीसी टी-२० विश्वचषकाबद्दल कधी निर्णय घेतं आणि बीसीसीआय आयपीएलची घोषणा कधी करतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.