अंकित चव्हाण आणि अजित चंडिला यांच्याशी आर्थिक व्यवहार केल्याची कबुली सट्टेबाज टिंकू ऊर्फ अश्निव अग्रवाल याने दिली. दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असलेल्या टिंकूला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्याला ६ जूनपर्यंत मुंबई पोलिसांच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी शनिवारी केलेल्या चौकशीत टिंकूकडून महत्त्वापूर्ण माहिती हाती आल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुंबई पोलिसांच्या चौकशीत टिंकू मंडीचे नाव समोर आल्यानंतर दिल्ली पोलिसांकडून त्याचा ताबा मिळवला होता. त्याला शनिवारी किल्ला न्यायालयात हजर केले असता ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. टिंकूने क्रिकेटर अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांच्याशी संबंध असल्याचे मान्य केले. २८ मार्च रोजी दिल्लीत अजित चंडिलाला याला २० लाख रुपये दिल्याची माहिती त्याने दिली. जर टिंकूच्या चौकशीत नवीन माहिती मिळाली तर अंकित आणि अजित चंडिला यांचा ताबा दिल्ली पोलिसांकडून घेतला जाईल, असे पोलिसांनी सांगितले. चेन्नईचा हॉटेल व्यावसायिक व्हिक्टर उर्फ विक्रम अग्रवाल याची शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी चौकशी करण्यात आली. तर दिल्लीचा बिल्डर आनंद सक्सेना प्रकृती अस्वास्थ्यामुळे चौकशीसाठी हजर राहू शकत नसल्याचे त्याच्या वकिलांनी मुंबई पोलिसांना सांगितले.
मय्यपनला सावध करणारा कोण?
मॅच फिक्सिंग प्रकरणात गुरुनाथ मय्यपनला अद्याप क्लिन चिट देण्यात आलेली नाही. त्याचा आम्ही तपास करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुरुनाथ मय्यपनला एप्रिलमध्ये सावध करणारी व्यक्ती सुंदररमन असल्याचा पोलिसांचा संशय आहे. मात्र अद्याप ते स्पष्ट झालेले नाही. सुंदररमन हा बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन यांचा भाचा आहे. विंदू हासुद्धा सुंदररमन याच्या संपर्कात असल्याचे मोबाइल संभाषणावरून स्पष्ट झाले आहे. आयपीएल सामन्यादरम्यान विंदू आणि सुंदररमन यांच्यात पाच वेळा संभाषण झाले होते. विंदू बीसीसीआयशी संबंधित अनेकांच्या संपर्कात होता.